गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

चालले आहे असे भरधाव कोठे

सापडेना का मनाला ठाव कोठे
चालले आहे असे भरधाव कोठे
सोडले घर आणि चकवा लागलेला,
ना निवारा ना अता परताव कोठे
जाळपोळीच्या खुणांमध्ये कळेना
हरवले माझे फुलांचे गाव कोठे
शेज सरणाचीच आहे शेवटी तर
सांग आता, रंक कोठे राव कोठे ??
मागणार्यांाचीच गर्दी देवळाशी
 भक्त कोठे आणि भक्ती भाव कोठे?
मानले, केले खुळे साहस नि फसले
तू तरी केला मला मज्जाव कोठे?
फक्त इच्छा मांडते शब्दांमधे मी
सांग सरड्याची असावी धाव कोठे?
घेतला असताच निर्णय मीच तेव्हा
पण तुझा आलाच ना प्रस्ताव कोठे
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape