गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

पाहुनीया तुला शिरशिरी यायची

पाहुनीया तुला शिरशिरी यायची
लपवली मी तरी अंगभर व्हायची
मी भिजुन यायचे पावसा सोबती
 आणि हृदयी तुझ्या आग पेटायची
प्रेम बेबंद कर, टाक भिजवूनिया
पावसा घे मुभा मुक्त बरसायची
वेळ येता जवळ भेटण्याची तुला
अंतरेही अधिर होत धावायची
राहिली होउनी चक्र जी पाउले
ती कधी अंगणी मुक्त नाचायची.
येउनी सय तुझी आडवेळी कधी
स्पंदनांची जणू तार छेडायची
ये सख्या तोडुनी बांध सारे जुने
सोवळी ही घडी ना पुन्हा यायची.
मुक्त नाते तुझे आणि माझे खुळे
त्यास नावे कशाला उगा द्यायची ?
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape