मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

वाढले होते कधीचे एकमेकातील अंतर

वाढले होते कधीचे एकमेकातील अंतर
औपचारिकताच होती फक्त मी होण्यास बेघर !!
भेग नात्यातील की तो वेगळासा मोह होता?
पाय तेव्हा का घसरला यास नव्हते ठोस उत्तर
पाखरांची चलबिचल झाली कशाने आडवेळी
फक्त बोटाने जरा मी गीत लिहिले या नभावर ?
सांग वाताहातही कामास येते का कुणाच्या?
मागणे मागायचे तारा निखळतानाच सत्वर ??
बोचते आहे कधीचे शल्य ग्रिष्माच्या मनाला
मांडला संसार मोडे एक वळवाची खुळी सर
बांगड्या कुंकू फुले साड़ी नको मजला अखेरी
भाबड्या अपुल्या सयींनी झाक तू माझे कलेवर
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape