Friday, July 10, 2009

म्हातरपण!!! नको गं बाई..

अजून बस आली नव्हती.. आम्ही सगळ्याजणी आपापल्या मुलांना घेण्यासाठी त्या स्कूलबसच्या पिक-अप- ड्रॉप ऑफ स्टॉप वर उभ्या होतो. इतक्यात बस आलीच. लेकाच्या वर्गात आमच्या कॉम्प्लेक्स मधली ४ जणं आहेत. आणि शिवाय के जी च्या दुसर्‍या वर्गात असणारी आणखी ५-६ जण आहेत. बसमधून उतरल्या उतरल्या हे सगळे केजी'कर इतका चिवचिवाट करत असतात.. आपल्या बॅगा आयांच्या ताब्यात देऊन हे सगळे मस्त बागडत कुठे झाड्याच्या वाळलेल्या काठ्या गोळा कर, कुठे फुले तोड.. कुठे पेबल्स गोळा कर.. असं करत करत , शाळेत काय झालं हे सांगण्याची अहमहमिका लावत हे सगळे उड्या मारत घरी जातात. पण आज.. सगळंच शांत होतं. थोडं आश्चर्य वाटलं. पण आज शाळेत डॉक्टर्स विजिट होती. मुलांना मेडीकल इक्विपमेंट्स , स्टेथोस्कोपने हृदयाचे ठोके मोजणे, स्वतःच्या बोटावर छोटेसे प्लास्टर करणे इ. गोष्टीं ची ओळख आणि माहिती होणार होती. त्यामुळे थोडी कंटाळली असतील मुलं असं वाटलं.

घरी आल्या आल्या लेक उदासच वाटत होता. मी छेडलं तर म्हणाला.. "आय एम टायर्ड.." मी पण सोडून दिलं.
त्यानंतर रात्री झोपण्या आधी लेक मला म्हणाला," तू किती यर्स ओल्ड आहेस?" तो नेहमीच त्याच्या आणि माझ्या वयाची तुलना करत असतो आणि शेवटी म्हणतो,"मी कधी होणार तुझ्या इतका मोठा.." हे माहिती असल्यामुळे मी लग्गेच म्हणाले,"मी ३० यर्स ओल्ड आहे.." तर एकदम आनंदाने म्हणाला..." म्हणजे तू म्हातारी नाहीयेस... येऽऽऽऽ!! तू म्हातारी नाहीयेस ना आई??" त्याच्या चेहर्‍यावर खूप आनंद दिसत होता. मी म्हणाले,"नाही.. मी अजून तरी म्हातारी नाहीये." मग एकदम म्हणाला ," तू अज्जिबात व्हायचं नाहीस म्हातारी.." मी कामात होते त्यामुळे फक्त ,"बर!!" असं म्हणून विषय सोडून दिला.
आणखी काही दिवसांनी एकदम बूट घालता घालता म्हणाला, "तू अज्जिबात म्हातारी व्हायचं नाहीस, आय डोण्ट वॉन्ट यू तू हॅव ग्रे हेअर..!" कशाचा काही संदर्भ नसताना असं बोलला मला थोडं नवल वाटलं. बूट घालताना एकदम काय आठवलं याला? पण विषय फार नाही वाढवला. मला वाटलं की, म्हातारी झाल्यावर मी कदाचित चांगली दिसणार नाही असं त्याला वाटत असावं आणि म्हणून हा असं म्हणतो आहे. एकदा वाटलं त्याला सांगावं की, हे असं काही नसतं मी काही लग्गेच वाईट नाही दिसायला लागणार. पण तो विचार मी झटकून टाकला कारण असं सांगितल्यानंतर पुढे येणार्‍या प्रश्नांची भिती वाटली मला.

असंच एकदा तो सोफ्यावर उड्या मारत होता. मी तिथेच बसले होते. मी म्हणाले, "अरे माझ्या पाठीवर वगैरे पडशील.. माझी पाठ दुखेल ना. " असं म्हंटल्याबरोबर हा थांबला आणि म्हणाला, "म्हणजे पणजी आज्जी सारखी तू खाली वाकून चालणार का मग??" (माझी आजी सधारण २ वर्षापूर्वी गेली.. ती शेवटी शेवटी वाकलेली होती.. आणि त्याला ती अजूनही आठवते.) मी म्हणाले.."पणजी आज्जी म्हातारी होती.. म्हणून वाकून चालत होती." लग्गेच निर्वाणीच्या सुरात सांगितलं मला,"तू अज्जिबात म्हातारी व्हायचंच नाहीयेस ". पुन्हा मी बुचकळ्यात. विचारलं "तुला कुणी सांगितलं हे सगळं?" तर म्हणे, "स्कूल मध्ये एकजण आहे तो म्हणाला.." मुलामुलांत काहीतरी असं बोलणं झालं असावं असा समज झाला माझा.
एकदा रात्री झोपेतही असंच काहीसं बडबडत होता. मग मात्र मी सटपटले.. मला कळेना काय याच्या डोक्यात आलंय हे एकदम. असा का म्हणतो आहे सारखं सारखं? पण त्याच्यापाशी विषय वाढवण्यात अर्थ नव्हता. प्रभू मास्तरांना मी व्य नी ने ही समस्या सांगितली. त्यांनी सांगितलं," सध्या काहीच नका करू, पण तुमचा एकही केस पांढरा होणार नाही याची काळजी घ्या." हरकत नाही. काही दिवस ठीक होते. शाळा बंद झाली.. सुट्ट्या सुरू झाल्या. आता या विषयाबद्दल शाळेत जाऊन चर्चा तरी कुणाशी करणार?

एकदा तो जेवत होता, मी म्हणाले,"चल, संपव लवकर तू बीग बॉय आहेस ना? आता फस्ट ग्रेड ला जाणार ना तू.. मोठा झालास आता. मग लवकर जेवायला नको का?" लग्गेच प्रश्न आला,"मी फस्ट ग्रेड ला गेल्यावर तू कशी होणार?" मला प्रश्न नाही समजला. म्हणाले, "कशी होणार म्हणजे?". तर म्हणाला,"तू पण मोठी होणार का?" ... मला कळेना आता काय उत्तर द्यावं. मी म्हणाले," हो थोडीशी.." तर लग्गेच.." म्हणजे थोडीशी म्हातारी होणार का?" त्याच्या प्रश्नाचा रोख समजला. मी म्हणाले,"मनू.. म्हातारी लग्गेच कशी होईन? तू हळूहळू मोठा होशील तेव्हा मी हळूहळू म्हातारी होईन.." ... एकदम डोळ्यांत त्याच्या पाणी आलं... आणि रडत रडत म्हणाला," मी नाही जाणार फस्ट ग्रेड ला. आय डोन्ट वॉन्ट टू बीकम बीग बॉय्..मी मोठा नाही होणार..... " मला खूप वाईट वाटलं. म्हणाले.. "बर असूदे.. मी नाही होत म्हातारी.. ओके??" .. त्याला जवळ घेऊन जेवण त्याचं पूर्ण केलं. पण आता माझ्या डोक्यातून हा किडा जाईना..

एकेदिवशी मैत्रीणीकडे गेले होते. हा विषय आता पर्यंत मी काढला नव्हता कोणापाशी. पण तेव्हा मात्र काढला. तेव्हा समजलं ते असं.. तिचा मुलगा सुद्धा तिला विचारत होता,'आजि-आजोबा म्हातारे आहेत का?' तिने 'हो' असं सांगताच तो एकदम रडायला लागला. तिने विचारताच, 'नाऊ दे आर गोईंग टू डाय..." असं म्हणत तो पुन्हा रडायला लागला. मी माझ्या बाकीच्या मैत्रीणींकडे चौकशी केली तर थोड्याफार फरकाने सगळ्यांच्याकडे हाच सीन होता. त्यातल्या एकीकडे ही रडारडी खूपच झाली होती. तीने शाळा संपायच्या आधी शाळेत जाऊन चौकशी केली होती तेव्हा समजलं.. डॉक्टर्स व्हिजिट शाळेत होती तेव्हा इतर माहिती सोबत त्यांना ह्युमन लाईफ सायकलची सुद्धा थोडी माहिती सांगितली होती. बर्थ टू डेथ. ह्युमन बॉर्न, दे ग्रो... दे बिकम ओल्ड आणि फायनली दे डाय...!! ................... एकदम ट्युब पेटली. मी याला म्हातारी व्हायला नको आहे... कारण मी म्हातारी झाल्यावर मी मरणार अशी भिती त्याला वाटते आहे... काय करू मी?? कारण हे डोक्यातून काढणं अवघड होतं. तसं काही नसतं असं सांगितलं तर स्कूल मध्ये मग खोटं का सांगितलं असं विचारणार हा.. आणि हे खरं आहे असं सांगितलं तर.. पुढची रडारडी अटळ होती आणि काय माहिती किती दिवस आणखी हेच डोक्यात घेऊन बसला असता?

मनांत आलं, 'लहान मुलांना इतकं जपणारी यांची अमेरिकन संस्कृती.. पण मग ५-६ वर्षाच्या मुलांना ह्युमन लाई सायकल सांगायची काय गरज होती. मला खात्री आहे की, आमच्याच नव्हे तर अमेरिकन मुलांच्या घरातही थोडेफार अशी रडारडी झालीच असणार. याची कल्पना त्या डॉक्टर्स ना नसावी का? शाळेच्या पहिल्या दिवशी भेट म्हणून दिलेल्या गोष्टीच्या पुस्तकात कुठेतरी 'मॉन्स्टर किल्ड द काऊ..' असं वाक्य आलं तर शाळेने ती पुस्तकं परत मागवून घेतली होती..का? तर मुलांच्या मनावर किल्ड सारखे शब्द फार परिणाम करतात.. मग हे तर त्याहून भयानक होतं. हे समजलं नसेल का शाळेला? की शाळेने आपलं काम केलं डॉक्टर्स च्या व्हिजिटचं आणि डॉक्टर्स नी आपलं काम केलं !!! नक्की काय समजायचं??

त्याबद्दल काहीही विषय मी काढला नाही. मध्ये बरेच दिवस गेले.. मला वाटलं हा विसरला असेल. पण नाही!! पुन्हा एकदा प्रश्न आलाच.. "तू म्हातारी नाही ना होणार?" सावध पवित्रा घेऊन मी म्हणाले, " मनू.. तू भरपूर भरपूर मोठा होईपर्यंत मी अजिबात म्हातारी होणार नाही. " ... चेहरा थोडा उजळला त्याचा." प्रॉमिस???"....... माझ्याही नकळत मी..."प्रॉमिस्स!" म्हणून गेले.

(बहुधा समाधान झालं असावं... बघूया पुढे काय होतं ते!!)

- प्राजु

Wednesday, July 8, 2009

प्रिय सौ. आईस..!

माझं तुझ्यासोबत असणं..
माझ्या कौतुकात तुझं बुडुन जाणं..
माझ्या आवडीनिवडी
सांभाळण्यासाठी तू
तुझ्या कामांना बाजूला ठेवणं..
संपूर्ण महिनाभर चालणारा हा कौतुकाचा सोहळा..!!
पण... काहितरी राहून गेलंय..
आपलं निवांत गप्पा मारणं..
एकमेकींच्यासोबत !
केवळ अन केवळ बोलणं....
असं झालंच नाही गं!
हिंडलो, फिरलो.. खेळलो..
पण.. फक्त आणि फक्त आपण दोघी
कितीवेळ एकमेकीसोबत होतो??

आता तू येणार...

तुझं येणं तसं वर्षभर लांबलं..
.... अन शेवटी
हो नाही करता करता तू आलीसही..
तू इथे आल्यावर.. हिंडण्या फिरण्यासोबतच
तुझ्याशी खूप खूप गप्पा मारायच्या... ठरवलं होतं मी.
कितीतरी वेळा एकत्र हिंडलो, फिरलो..
कितीतरी वेळा..."तू कर ना चहा माझ्यासाठी.." असा हट्ट केला..
किती पदार्थ खाल्ले तुझ्या हातचे..!!
भांडणही झालं..
एकमेकींशी गप्पा सुद्धा मारल्या.. ठरवल्याप्रमाणे!!!
.......... त्या पुरेश्या होत्या का गं??
मन का नाही भरलं कधीच?
तुझ्या इथे असण्याची सवय .. जाईल का लवकर?
घरातला प्रत्येक कोपरा... ..
मला तुझ्या वास्तव्याची जाणीव करून देतो आहे..
आणि पुन्हा पुन्हा असंच का वाटतं आहे की..
आपण दोघी मनसोक्त भेटलोच नाही..
आणि मनसोक्त बोललोही नाही..!!!

मनसोक्त ची व्याख्या नक्की काय असते??

Wednesday, July 1, 2009

मृगजळ - (अंतिम)

माय.. ए माय! उठ गं.. थोडं जेवून घे. आज रात्रिच हे वाळवंटातलं जगणं संपणार आहे.. बघ तू. हितनं लांब जायचंय आपल्याला. खूप लांब." ताट वाढता वाढता ती बोलत होती..
मायचं ताट वाढून घेऊन ती माय जवळ आली.."माय... ए माय... माय गं!!! माऽऽऽऽऽऽऽऽऽय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!" हातातलं ताट थाडकन् खाली पडलं. मायनं जगणं केव्हाच संपवलं होतं आणि ती खूप खूप लांब निघून गेली होती.........
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माय गेली.. आणि तिच्याबरोबर राणीनं पाहिलेलं स्वप्नही गेलं. राणीच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. राणीवर आभाळ कोसळलं होतं. तिची माय.. तिला पदोपदी जपणारी, शाळेला सोडायला येणारी, तिच्यासाठी आबासारख्या नराधमाची रखेली बनून राहणारी, आणि तरिही आबापासून राणीला जपणारी.. लहानपणी राणीचं बोट धरून तिला शाळेत सोडणारी.. गुत्त्यावर भांडी-फरशी करत करत इतर घरची कामं करून राणीसाठी नवनवीन वस्तू आणणारी... आणि शेवटच्या क्षणी राणीला' मला माफ कर 'म्हणणारी..! मायची हजारो रूपं राणीसमोर यायला लागली.
'माय... माझी माय... माझी माय गेली...!!!' राणीचं मन हे मानायला तयारच नव्हतं. अशीच विचार करत ती झोपून राहिली होती... डोळ्यांना अखंड धार लागली होती. इतक्यात दार वाजलं आणि तिच्या कानावर काहीतरी कुजबुज ऐकायला आली. आबा!!! .. हो आबाचाच आवाज!!
"आजच घेऊन जा ... म्या उद्या येतू खोलीवर. पन ४००० रूपयांच्या खाली न्हाय बघ...." आबा बोलत होता.
" आजचा दिस जरा कळ काढ आबा. उद्या खोलीवर आलास की तिचं रगात तूच काढ की... हाय काय न्हाय काय! पण ४००० रूप्पय म्हणजे लय जास्त हाईत बघ.. तीन हजारात जमव की रं."
हा दुसरा आवाज तानाचा होता. हो.. हा ताना चंदाचा दलाल होता. राणीच्या डोक्यात चक्र फिरायला लागली. तिला आठवलं मायनं सांगितलेलं. तिला आठवली आबाची हिडीस नजर... आणि रगात काढणार म्हणजे काय हे न समजण्याइतकी ती वेडी नव्हती. पुढचं तिला ऐकवेना.. ती सरळ उठून खिडकीत येऊन बसली.
आजच... आजचीच रात्र... बास!! उद्या नाही...तिच्या मनाने उचल खाल्ली. पुन्हा एकदा सगळी तयारी केली. प्लॅन तर तयारच होता... मात्र आता त्यात ती एकटीच होती. तिचा आधार असलेली तिची माय तोच्यासोबत नव्हती. आबा आणि ताना चं बोलणं बंद झाल्यावर..तिनं एकदा कानोसा घेतला. मायच्या पलंगाखालची लाकडी मोडकी पेटी काढली. त्यात मायच्या वस्तू होत्या. मायनं थोडेसे साठवलेले पैसे होते. राणीनं पुन्हा सामान सगळं एकत्र करून ठेवलं. तिन्ही सांज होत आली होती. खिडकीतून दिसणार्‍या कोपर्‍यावरच्या मरीआईच्या देवळाकडे पाहून हात जोडले. एकवार गुत्त्यात जाऊन आबा कुठे आहे पाहून आली. आबा अजूनही तानाशीच बोलत होता. दोघं मिळून बाटली घेऊन बसले होते. हीच योग्य वेळ!!!! ती तश्शीच परत आली आपलं बोचकं उचललं आणि गुत्त्याच्या मागे असलेला बाभूळ बनातून तीने चालायला सुरूवात केली. ती देवाकडं प्रार्थना करत होती की, आबाच्या ओळखीचं कोणी भेटू नये...! इतक्यात..म्हादा दिसलाच! आबाच्या पंक्तीला कायम असणारा म्हादा... ! तिला भिती वाटली. आता हा आपल्याला काहीतरी विचारणार?? आपण काय सांगायचं?? हा आबाला जाऊन सांगणार... आबा मग त्याची माणसं घेऊन येणार... काय होणार??
हा विचार करत असतानाच म्हादा जवळ आला.. चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होतं?? एकवार तिच्याकडे पाहिलं त्यानं. तिच्या हातातलं तिचं बोचकं.... आणि तिच्या भेदरलेला चेहरा पाहून्"जपून जा बाई..!!" इतकंच तो म्हणाला. राणीला आश्चर्य वाटलं. त्याच्याकडे पाहून हलकंस स्मित करत ती पळत सुटली. निदान म्हादा आबाला जाऊन सांगेल अशी भिती तरी नव्हती. खूप पळल्यावर तिला धाप लागली. तिनं सहज मागे वळून पाहिलं... वस्ती लांब राहिली होती. समोरचा डोंगर पार केला की, हाय वे लागत होता. राणी पुन्हा नव्या जोमाने पळायला लागली. भराभर डोंगर चढू लागली. जणू मायनं जाताना तिला स्वत:चं सगळं बळ दिलं होतं. काट्याकुट्यातून.. झाडांचा आधार घेत राणी हायवे वर आली. ती हाय्वेवर येईपर्यंत अंधार अगदी गडद्द झाला होता. तिला भूकही लागली होती. पण हा हायवे म्हणजे आबाच्या दारूचे फुगे ने-आण करणार्‍या लोकांचा रोजचा रस्त होता. आणि फुग्यांची ने-आण रात्रिच्या गुन्हेगारी अंधारातच होते हे ही ती जाणून होती. काहीही करून हा भाग लवकरात लवकर सोडला पाहिजे. घामाने डबडबलेली राणी... हायवे वर उभी होती. समोरून येणार्‍या एका ट्र्कला तीने हात केला. ट्र्क थांबला. काहीही विचार न करता ती चढली. आणि मग तिच्या लक्षात आलं ज्या ट्र्क मध्ये चढलो आहोत तो ट्र्क वस्तीवरच्याच सिकंदरचा होता. म्हणजे हा ट्रक आता वस्तीवरच निघाला होता. सिकंदरचा भाऊ सुंदर ट्र्क वर होता. तिला काही समजायच्या आत ट्र्क चालू झाला होता आणि रस्त्याला लागला होता. एक क्षण!!! फक्त एक क्षण विचार करून राणीनं धावत्या ट्रक मधून खाली उडी टाकली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडी-झुडपात ती एकदम गुडूप झाली. सुंदर ट्रकमधून उतरला झाडीच्या थोडं आजूबाजूला त्याने पाहिलं पण अंधारात काहीही न दिसल्याने त्याने नाद सोडून दिला आणि तो रस्त्याला लागला. तो गेला... मात्र आता राणी पळाली ही बातमी खूपच लवकर आबाला समजणार होती. राणीच्या हे लक्षात यायला वेळ लागला नाही. ट्र्क गेल्यावर ती झाडीतून बाहेर आली.. आणि मागून येणारी एस्टी बस तिने हात दाखवून थांबवली. आणि ती त्यात चढली. कुठे जाणार ही बस.. काहीही माहिती नव्हतं. कंडक्टरनं विचारलं, "कुठं जायचं..?" त्यावर फक्त "शेवटचा ष्टॉप..!" इतकंच उत्तर दिलं तिनं. विचित्र नजरेने बघत कंडेक्टरनं तिकिट काढलं आणि , " ३५ रूपये." असं म्हणत तिच्या हातात तिकिट दिलं. मायनं साठवलेले पैसे किती होते तेही तिला माहिती नव्हतं. त्यातून तिने २० ची एक नोट, १० ची एक नोट, २ ची एक नोट आणि १ रूपयाची ३ नाणी काढून दिली.
बसने वेग घेतला... श्रमाने आणि भूकेमुळे थकलेल्या राणीला किंचित ग्लानी आली.
बसचा शेवटचा स्टॉप आला तशी ती बसमधून उतरली. कोणतं गाव आहे .. ?? काहीही माहिती नव्हतं. रात्रीच्या अंधारात ती त्या गावाच्या गल्लीतून चालत निघाली. एका गल्लीच्या कोपर्‍यावर असताना तिला लांबून आवाज आला, "हुर्रर्र.. हॉ.... हैक... हुर्रर्र...!" तिने पाहिलं एक माणूस शेळ्या हाकत निघाला होता. त्याच्याशी बोलावं का? मदत मागावी का? असा विचार करत असतानाच तो तिच्या जवळ आला.. गडद्द अंधार असला तरी समोर एक मुलगी उभी आहे हे समजायला त्याला वेळ लागला नाही.
"कोन?? कोन हाय तिथं??" तो म्हणाला.
"म्या... म्या रानी!!" चाचपडत ती म्हणाली.
"हिथं कशापाई हुबी बाय तू ऑ??" तो म्हणाला.
"मी लांबच्या गावास्नं आलेय.. आजची रात्र काडायची हाय.. जागा मिळन का कुटं??' थोडं धीटपणे तिनं विचारलं.
"माज्या घरी चालनार असंल तर चल बाय.. .." असं म्हणत तो पुढे चालू लागला. राणीला प्रश्न पडला.."काय करावं?? याच्या वर विश्वास ठेवावा का? जावं का नको?? " पण आताच्या परिस्थितीत तिला त्याच्या बरोबर जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. ती गुमान त्याच्या पाठोपाठ गेली. त्याच घर म्हणजे एक खोपटं होतं. बाहेर शेळ्या बांधून तो आत गेला. तो एकटाच रहात होता. याने तिला खायला काही हवे का विचारले. पण तिने नको म्हणून सांगितलं. एका कोपर्‍यात आपलं बोचकं घेऊन ती पडून राहिली. आजची रात्र तोंड लपवायला जागा मिळाली हेच तिच्यासाठी खूप होतं. उद्या सकाळी काय करायचं ते ठरवता येणार होतं. त्या झोपडी वजा घरात असं काय होतं देव जाणे , पण राणीला पडल्या पडल्या गाढ झोप लागली.
सकाळी शेळ्यांच्या ओरडण्याने तिला जाग आली. उजाडलं होतं. ती उठून बसली. कालचा तो माणूस चुलीशेजारी बसून काहीतरी करत होता. तिच्या चाहूलीने त्याने मागे वळून पाहिलं... . आणि... तो तिच्याकडे पहातच राहिला..... ! तिचे विस्कटलेले केस... कालच्या श्रमाने आलेला थकवा.. पण आता थोडीफार आलेली निश्चिंती! राणी तशाही अवस्थेत खूप देखणी दिसत होती.

"मी... मी सारंगा!! ................ च... च्या..! घेनार ना?" तो म्हणाला. मानेनेच तीने 'हो' म्हणून सांगितले. उठून ती आन्हिकं उरकून आली. त्याने तिला चहा दिला आणि स्वतःही घेतला. तो चहा घेत असताना ती त्याच्याकडे पहात होती. साधारण ३०-३२ वयाचा असणारा तो.. पण चेहर्‍यावरून त्याचं मन स्वच्छ असेल असं वाट होतं. नाही म्हंटलं तरी तिलाही तो आवडला होता. चहा झाल्यावर थोडंसं वातावरण सैलावलं. किंचित हसून तिने त्याचे आभार मानले.

"बाय.. कुटून आलिस?? अन् इतक्या रातच्याला कशी काय आलिस म्हनायची? भ्या नाय का वाटली?" त्याने विचारलं.
"ते सांगन कवातरी. मला सांग.. हितं कुटं काम मिळन का मला? काय बी असुदे.. म्या करन." ती म्हणाली.
"मिळन की! हितं यक कासार हाय.. त्याच्याकडं जाशील का? येनार्‍या बायांना बांगड्या दावायच्या अन् भरायच्या." त्यानं सांगितलं. "पन तुझं नाव काय म्हनायचं??"
"मी रानी...मी करन ते काम.." राणी उत्साहानं म्हणाली. दोघांमध्ये काहीही विशेष संवाद न होता त्यांच्यामध्ये एक नाजूक धागा जुळायला लागला आहे.. असं राणीला वाटलं.
राणी कामाला लागली. हे काम तिला आवडलं. तिच्या ओळखी झाल्या. राखी नावाची नवी मैत्रीण मिळाली तिला. दोघींचं छान जमलं होतं. खूप लवकर त्या अगदी जिवश्च कंठश्च मैत्रीणी झाल्या. राखीच्या मदतीने तिला एका भाजीवालिच्या घरी एक खोलीही मिळाली रहायला. सारंगालाही ती भेटत होती. कासाराच्या दुकानाला मंगळावारी सुट्टी असायची तेव्हा राणी सारंगा बरोबर त्याच्या शेळ्या हाकायला जात असे. रानातून वनातून त्याच्या बरोबर फिरताना तिला खूप मजा वाटायची. सारंगा खूप काळजी घ्यायचा तिची. तिला नदीवर त्याने नेलं. नदीवरच्या मंदीरात ती जाऊन आली. त्याच्या शेळ्याही राणीला आता ओळखू लागल्या. पावसाळ्यांत ती ,राखी आणि सारंगा तिघे मिळून डोंगर मथ्यावर चढून जायचे. तिथून दिसणारा गावचा परिसर राणीला फार आवडायचा. नदीच्या मऊ मऊ मातीत चिखलाने माखलेले पाय घेऊन चालताना तिला होणारा आनंद अवर्णनिय होता. तिला हळूहळू सारंगाच्या आवडीनिवडीही समजल्या. आपल्या आणि त्याच्या आवडीनिवडी कित्ती जुळतात नै!!! असंही तिला हजारवेळा वाटलं.

कारवानांच्या वस्तीवर एक स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये केवळ संभोगापुरतं असलेलं नातं... आणि हे.. तिचं आणि सारंगाचं नातं ज्याला सध्यातरी काहीच नाव नव्हतं!!! किती फरक होता दोन्हीमध्ये!!! स्त्री-पुरूषामध्ये अशाही प्रकारचं नातं असू शकतं याचा तिने विचारही केला नव्हता. दिवसेंदिवस ती सारंगाच्या जास्ती जवळ जाऊ लागली. सारंगालाही तिच्याबद्दल आपुलकी वाटत होतीच. सारंगालाही तिच्या आवडीनिवडी समजल्या होत्या. कधी कधी तो शेताच्या कामासाठी तालुक्याच्या गावी जायचा तेव्हा तिच्यासाठी तिथून मिठाई घेऊन यायचा. ती मिठाई बघून राणीला मायची खूप आठवण यायची. पण तिने अजून सारंगाला आपल्या भूतकाळाबद्दल सांगितलं नव्हतं. तिला भिती वाटायची आपली माय रखेली होती आणि आपल्या बापाचं नावंही आपल्याला माहिती नाही हे समजलं तर .. सारंगा कदाचित आपल्याला दूर लोटेल.
गावात जत्रा आली होती, सारंगा आणि राणी दोघंच जत्रेला गेले होते. उंच पाळण्यात सारंगा शेजारी बसताना तिला अजिबात भिती वाटली नाही. जत्रेत भरपूर हिंडून दोघं अगदी दमून घरी परतली. राणीला सारंगाचा इतका लळा लागला की तिला त्याच्या अस्तित्वापुढे भूतकाळाच्या खुणा थिट्या वाटू लागल्या. भूतकाळावर तिने मात केली होती. कारवानांच्या वस्तीत राहणार्‍या रखेलीची ती राणी हा शिक्का पूर्णपणे पुसून निघाला होता. ती होती आता सारंगाची आणि राखीची मैत्रीण.

"काय गं रानी?? सारंगाशी लगिन करशिल का?"... तिच्याकडे रोखून खट्याळ नजरेनं राखीनं विचारलं. राणी किंचितशी लाजली. तिला पुरेपूर माहिती होतं की, जर सारंगानं लग्नासंबंधी विचारलं तर आपण नाही म्हणू शकणारच नाही...
''राखी, अख्ख्या जिंदगानीत हा पहिलाच माणूस मला असा भेटला बघ, ज्याच्यावर इस्वास टाकावा असं वाटलं. याची नजर मला कधीही वाईट नाही बघ वाटली. " राणी शुन्यात नजर लावत म्हणाली. त्यानंतर त्या दोघी खूप वेळ सारंगाबद्दलच बोलत होत्या.
बरेच दिवस असेच गेले. राणी सारंगाने आपल्याला मागणी घालावी यासाठी आतुरतेने वाट पहात होती. मनांतल्या मनांत तिला मायचे बोल आठवत होते. "तुला बी कुणीतरी भेटल... तुला समजून घेनारा, तुज्या बा सारखा.'......... बा!!! पुन्हा बा आठवला की, राणीच्या मनातले विचार मनांतच विरून जात होते. सारंगाला काय सांगायचं बा बद्दल आणि माय बद्दल सुद्धा? एकेदिवशी ती सारंगाबरोबर त्याच्या शेळ्या हाकायला गेली होती रानांत..
तिथे नदीच्या काठावर नेहमीप्रमाणे बसून तळ्यात दगड टाकणं चालू होतं तिचं. सारंगा आला...
"हां बघ.... ह्ये बघ.. ह्ये कशे दोन पेरू गावले आता.. ह्यो मोठा तुला अन् ह्यो ल्हान मला..कसं??" सारंगा तिच्याकडे बघून हसत म्हणाला.
" लई दिसापासनं यक इचार येतोया मनांत... " राणी त्याच्या हातातला पेरू घेत त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाली. त्याच्या डोळ्यांत बघत असतानाही तिच्या मनांत आलं, किती साधा आहे हा!! किती प्रेम आहे याच्या डोळ्यांत आपल्याबद्दल!!!
"कसला गं इचार? सांग की..." सारंगाच्या आवाजाने तिची तंद्री भंगली.
" सारंगा, मी कोन कुटली.. काय ठाव हाय का तुला?" राणीनं विचारलेल्या प्रश्नानं सारंगा गोंधळला.
"म्हन्जे?".. सारंगाने विचारलं.
"म्हन्जे.. माझ्याबद्दल काय माहिती हाय का तुला?" राणीनं पुन्हा विचारलं.
"न्हाय बा. पन यक नक्की, तू लई चांगली हायस. ज्या घरी जाशील त्या घराला लई सुखी ठेवशील बघ.." सारंगा म्हणाला.
" सारंगा... तुज्याशी लई दिसापास्नं बोलायचं व्हतं.. बोलू का? पन, जे सांगन ना... तू रागावायचं न्हाय हां. ... " असं म्हणून मनाचा हिय्या करून राणीनं आपला भूतकाळ सारंगाला सांगायला सुरूवात केली. तिच्या दृष्टीने त्याला सगळं माहिती असणं आवश्यक होतं. ती जे काही सांगत होती.. ते अगदी मन लावून सारंगा ऐकत होता. मध्ये मध्ये त्याच्या चेहर्‍यावरचे भावही बदलत होते. मध्येच दु:खी होत होता.. मध्येच डोळ्यांत पाणी येत होतं त्याच्या. राणीचं सांगून संपलं तसं त्याने अतिशय प्रेमाने तिच्याकडे पाहिलं .. आणि म्हणाला, " जाऊदे.. जे झालं ते झालं.. पण आता हितून पुढं तुजं तुलाच खंबीर र्‍हायला हवं बाई..जमान लई वाईट हाय.तुला कसलीबी मदत लागली.. ह्यो सारंगा यील धावून. बिनदिक्कत हाक मार..." तिला धीर देत तो म्हणाला.
"सारंगा, मगाशी म्हनालास.. मी ज्या घरी जाईन त्या घराला सुखी ठेवीन म्हणून!!!... सारंगा... मला तुझ्या घराला सुखी करायचं हाय्!! माज्या संगट लगीन करशील..?" राणी डोळ्यांत पाणी आणून म्हणाली. सारंगा आता काय म्हणेल.. .. याचा विचार करत ती एकटक त्याच्या चेहर्‍याकडं बघत होती.
सारंगा मंद हसला... म्हणाला, "तू अजून १८ वर्स पूर्न बी न्ह्यायस. आनी मी तर ३१ वर्साचा हाय. तू ल्हान हाईस.. थोडी मोठ्ठी हो... मग बघूया.." सारंगा समजावणीच्या सूरांत म्हणाला...आणि तिथून उठला. शेळ्यांना हाकत चालू लागला. राणीला त्याच्या या वागण्याचं थोडं आश्चर्य वाटलं.. पण काही न बोलता तीही मुकाट त्याच्यामागे चालू लागली.

दुसरे दिवशी सकाळी.. राणी उठली. आज सारंगाकडून काय ते उत्तर घ्यायचंच.. हो तर हो अन् न्हाय तर न्हाय!!! असा निश्चय करून घरातून बाहेर पडली. सारंगाच्या घरी आली. झोपडीच्या दाराला टाळं ठोकलं होतं. 'आत्ता सकाळच्या पारी कुटं गेला ह्यो??' असा विचार करत ती तो ज्या शेतात काम करत असे त्या शेताकडे निघाली. शेतावरही तो नव्हता. शेताच्या मालकाकडे जाऊन तिने चौकशी केली तो तिथेही नव्हता. शेळ्या घेऊन रानांत गेला असेल लवकर म्हणून ती रानांत जाऊन आली. सगळ्या नेहमीच्या जागा तिने पाहिल्या... पण सारंगा कुठेच नव्हता. 'कुठे गेला असेल?? कालच्या आपल्या बोलण्याचा राग तर आला नसेल??..... पण नाही.. तसं असतं तर आपल्याला नक्की बोलला असता...' असा विचार करत ती संपूर्ण गावांत वणवण भटकत होती. कुठे शोधू ?? काय करू ? असं झालं होतं तिला. त्याला शोधण्यासाठी वणवण भटकत असतानाच तिला राखी भेटली. राणीचा रडवेला चेहरा पाहून ती काय ते समजली.... काहीही न बोलता तिने एक चिठ्ठी राणीच्या हातात सरकवली आणि अतिशय जड आंत: करणाने ती तिथून निघून गेली. राणीने चिठ्ठी उघडली,
" मला माफी कर रानी... तू काल मला तुझ्या आयुष्याबद्दल सांगून रिकामी झालीस. पन म्या कोनाला सांगू. तुला मी सांगूच शकलो नसतो ही गोष्ट... आनि सांगितल्यानंतर मला तुला तोंड सुद्धा दाखवावं वाटनार न्हाई याची खात्री होती.. म्हनून ही चिट्टी..
रानी........ म्या... म्या तुझा बा हाय!!!!!!!!!!!!!!! शक्य झालं तर मला माफी कर...."

सारंगा.... माजा बा!!!!!!!!!!!!!! माजा बा!!!!!!!!!!!!!!!! म्हनजे मायचा "त्यो".. हाच सारंगा.............
"माऽऽऽऽऽऽऽऽऽऽय!!!!!!!!!!!!!!!!!!!! " एक अस्फुट किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली आणि त्याक्षणी राणी रस्त्यावर कोसळली होती.
वाळवंटात पाण्याचा झरा फुटता फुटता आटून गेला होता...

(संपूर्ण)...

(हा भाग थोडा मोठा झाला आहे. कारण मला कथा याच भागांत संपवायची होती. चौथा भाग लिहिण्याचे पेशन्स माझ्यात नाहीयेत. वाचकांनी समजून घ्यावे ही विनंती. )