मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

न थमणारा पाउस

न थमणारा पाउस बसतो ओवत मोती पाण्याचे
कॉफी वाफाळूनी गाते हळवे बोल गाण्याचे 
टेबल धरते ताल दादरा लांबसडक त्या बोटांनी
वितळत जाते मिठीत माझे भिजले यौवन लोण्याचे
केसामधूनी थेंब वेचतो सडा सांडतो खांद्यावर
कॉफीचा दरवळ ओठातुन झिंग आणतो ओठावर
ओलेते कुंकू ओघळते ऐकुन ठोके हृदयाचे
अन ओलेते केशर पसरे ओल्या माझ्या भाळावर
अलगद ढळतो पदर शहाणा समजुन घेतो तो वाटे
खांद्यावर, मानेवर आलेले किती शहारे अन काटे
श्वासांची बेरीज होउनी चुकते गणिताचे उत्तर
लय गवसूनी , सूर लागुनी, गाणे हृदयाला भेटे
असे खुळेसे स्वप्नं रोज हा पाउस देतो जगण्याला
नसे जरी तो जवळ तरीही भाग पाडतो हसण्याला
सख्या तुझी अनिवार अशी सय करमणूक करते माझी
थोडासा शिडकाव करुनी उमलवते आयुष्याला
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape