बुधवार, १३ जुलै, २०११

षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर..

षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
विसर तो इतिहास सारा जाळुनीया राख कर

वेड होते त्या शिवाला मोगलाशी भांडला
वेड 'तात्या'ला तुझे जो सागरी झेपावला
यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर

टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे
चिंधड्या तव अस्मितेच्या फ़ाडती मुंग्या -किडे
ना कुणी तुज रक्षण्याला, तू अपेक्षा लाख कर!!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर

कोण मेले, काय झाले, ना इथे पडले कुणा
मी नि माझे घर सुखी बाकी कुणी काही म्हणा
भाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर!"
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर

दोष कोणा काय देऊ,भगवते, तू सांग ना
धाडसी नेतृत्व नाही, हा तुझा ठरला गुन्हा
चाड ना येथे कुणाला, हेच आता मान्य कर
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर

घालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधही
वाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेपही
घोषणा अन भाषणांची, मोज लांबी हात भर!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
- प्राजु

2 प्रतिसाद:

मंदार जोशी म्हणाले...

अत्युत्कृष्ठ कविता.
सुन्न झालो वाचून.

अभिजित मुळ्ये म्हणाले...

बॉम्बस्फोटाला उद्या एक महिना होत आहे, पण अद्याप ते कोणी केले याचा काहीही पत्ता लागलेला नाही. सर्वसामान्य मुंबईकराच्या भावना आपल्या कवितेतून पुरेपूर व्यक्त झालेल्या आहेत. मुंबई तरूण भारतच्या पहिल्या पानावर उद्या की कविता प्रसिद्ध करावी, असे मला वाटत आहे. त्याला तुमची परवानगी आहे का? - अभिजित मुळ्ये, कार्याकीर संपादक, मुंबई तरूण भारत. प्रतिसाद कृपया mtbedit@gmail.com या इमेल आयडीवर द्यावा.

Page copy protected against web site content infringement by Copyscape