खंत नाही खेद नाही..
खंत नाही खेद नाही, एक वेडी आस आहे
त्या नभाला जिंकण्याचा आज मजला ध्यास अहे
ना कुणीही सोबतीला, ना कुणी मागे पुढेही
मीच वेचावी फ़ुले अन मीच वेचावे खडेही
साथ ही काट्याकुट्यांची भासते मज खास आहे
चहु दिशांनी हात देता मी निघावे त्या प्रवासा
कोवळ्या किरणांतुनी त्या भास्कराचाही दिलासा
जाणते मी हा जरासा वेगळा हव्यास आहे
पर्वतांना ठोकरावे वाहुनी वार्यासवे मी
रात उजळावी जराशी चमकुनी तार्यासवे मी
विश्व सारे वर्तुळाचे, मी तयाचा व्यास आहे
मागणे माझे न काही! ईश्वराला त्या स्मरूनी
हात व्हावे हे पुढे 'देण्या'स केवळ भरभरूनी
शिल्पकारा मीच माझ्या जीवनी विश्वास आहे
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा