.. रात मजला जागावे
आठवांचे धावुनी आले थवे
आणि आता रात मजला जागवे
चालताना हात होते गुंफ़ले
पापण्यांशी स्वप्न होते शिंपले
काय सांगू त्या क्षणांचे गोडवे!!
आणि आता रात मजला जागवे
गंधलेला श्वास होता कापरा
थरथरूनी स्पर्श झाला लाजरा
आणि ओठांची ती ओली आर्जवे
आणि आता रात मजला जागवे
बोलणे आता स्वत:शी राहिले
त्या क्षणांना पापण्यांतुन वाहिले
राहिली मज सोबतीला आसवे
आणि आता रात मजला जागवे
लाघवी ती वेदना सलते जरी
मी व्यथा काव्यातुनी गातो जरी
ही विराणी गात घुमती पारवे
आणि आता रात मजला जागवे
-प्राजु
1 प्रतिसाद:
चालताना हात होते गुंफ़ले
पापण्यांशी स्वप्न होते शिंपले
गंधलेला श्वास होता कापरा
थरथरूनी स्पर्श झाला लाजरा
त्या हुरहूर लावणा-या गुलाबी क्षणांचे किती सुंदर वर्णन....
टिप्पणी पोस्ट करा