नक्षत्रांची खणी..
सळसळणारी गर्द राई
खळखळणारे झरे
तुझेच यौवन, तुझेच हासू
मनांत ग भिरभिरे
मोहक नाजूक लाजाळूची
लाज उमटली गाली
हळूच मिटले यौवन ऐसे
जशी पसरली लाली!!
गौरवर्णी रेखिव काया
चंदन भिजले जणू
दरवळ ऐसा भोवती माझ्या
शहारला अणुरेणू
मेघ सावळे दाटून आले
झुकता ती पापणी
सलज्ज मोती भाव बोलके
नक्षत्रांची खणी
गुलबक्षाची फ़ुले रंगली
नाजूक ओठावरी
झुळझुळणारे गीत उमटले
त्यांच्या काठावरी
सोनपरी, की फ़ुलराणी तू
म्हणू तुज कामिनी
दृष्ट काढतो तुझी फ़ुलांनी
माझी हो स्वामिनी
-प्राजु
2 प्रतिसाद:
अतिशय सुंदर लय
गौरवर्णी रेखिव काया
चंदन भिजले जणू
खुप सुंदर !
मेघ सावळे दाटून आले
झुकता ती पापणी
सलज्ज मोती भाव बोलके
नक्षत्रांची खणी
व्वा छानच !
प्राजू किती सुंदर लिहिता तुम्ही
जणू सरस्वतीची वीणा झंकारते शब्दा शब्दातून !
खूपच प्रासादिक .. रसाळ .. आणि मनाला स्पर्श करणारे ! खूप आवडल्या तुमच्या कविता !
टिप्पणी पोस्ट करा