गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

आयुष्य मागते मी..



१८ फ़ेब्रु. आजच्या दिवशी देवाच्या चरणी हेच मागणे..


लाभेल थोडके जे, ते रम्य मागते मी
सुंदर क्षणांत रमले, आयुष्य मागते मी

वार्‍यापरी फ़िरूनी, सुखवावया जगाला
अस्तित्व खास माझे, अदृश्य मागते मी

पाहून दु:ख भवती, काळीज पोखरावे
समजावया व्यथांना, कारूण्य मागते मी

ऐकून काव्य माझे, रमतील जीव ऐसे
शब्दांत कल्पनांचे, सौंदर्य मागते मी

पेंगुळल्या दिशांची, ग्लानी निघून जावी ..
खुलण्या पुन्हा नव्याने, चैतन्य मागते मी

येईल त्या क्षणाला अपुले म्हणून घ्यावे
त्यातच जगून घ्याया तारूण्य मागते मी

मृदगंध दर्वळावा, ओलावल्या भुईचा
मेघाकडे सरींचे , बघ अर्घ्य मागते मी

सार्‍या चराचराला आनंद मी लुटावा
देवा, असे मनाचे ऐश्वर्य मागते मी

- प्राजु

1 प्रतिसाद:

Xcogitation म्हणाले...

ऐकुन काव्य माझे, रमतील जीव ऐसे , शब्दात कल्पनांचे सौंदर्य मागते मी....खरंच ह्या ओळी खुपच छान जमून आल्या. हे तुमचे मागणे एकप्रकारे तुमच्या कविता वाचणार्यांसाठीचे मागणे आहे. तुमची कविता अजून स्पष्ट सुंदर झाली तर ती वाचणार्याच्या काळजाला जास्त भिडणार.जे न देखे रवी ते देखे कवी असे माझी आई काल माझ्याशी स्काईप वरून बोलताना म्हणाली. त्याचा एक अर्थ असा माझ्या ध्यानात आला कि कवी स्वतःच्या नि इतरांच्या अंतरंगातही डोकावू शकतो, जिथे सुर्य किरणेही पोहोचू शकत नाहीत, जी नाहीतर जगाच्या कोपर्या कोपर्यात पोहोचतात....
असो ...
तुमच्या ह्या कवितेतल्या सगळ्या मागण्यांसाठी आमेन, तथास्तु ( आशिर्वाद ह्या अर्थाने नव्हे तर ते तसे व्हावे हि प्रार्थना ह्या अर्थाने).

नीरज फिलाडेल्फिया

Page copy protected against web site content infringement by Copyscape