रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

तुझ्या सावलीतच निखारे असावे..

तुझ्या आठवांचे धुमारे असावे
दिगंतावरी जे नजारे असावे

कसा आगळा आज पाऊस वाटे
कुणी थेंबही झेलणारे असावे!

कसा मोगर्‍याचा इथे गंध आला
तुझ्या गावचे मंद वारे असावे

तुझा देह की पौर्णिमा ती रुपेरी
तिथे सांडले चंद्र-तारे असावे

जरा पास येता असा तप्त झालो
तुझ्या सावलीतच निखारे असावे

उरी टीचभरही न जागा रिकामी?
तुझी आठवे अन पसारे असावे

- प्राजु

1 प्रतिसाद:

अरविंद म्हणाले...

कसा मोगर्‍याचा इथे गंध आला
तुझ्या गावचे मंद वारे असावे

सुंदर शेर प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape