तुझी वीज घेउन कडाडून ये ना..
प्रिये चौकटी-पाश, तोडून ये ना
जरा उंबरा आज, लंघून ये ना
तुझ्या पल्लवाच्या सुवासात माझे
पहा गुंतले श्वास घेऊन ये ना
शिरूनी सये अंतरातून माझ्या
मनाच्या शिवारात हिंडून ये ना
तुझे रूप-लावण्य, 'ऐश्वर्य' माझे
जगाला जरा आज सांगून ये ना
इथे माळरानी फ़ुलू दे फ़ुलांना
तुझे धुंद आभाळ शिंपून ये ना
जणू कोरडे भासते काव्य माझे
तुझे शब्द वेल्हाळ गुंफ़ून ये ना
इथे मेघ होऊनिया थांबलो मी
तुझी वीज घेउन कडाडून ये ना
- प्राजु
1 प्रतिसाद:
आपला ब्लॉग एक मराठीतील परिपुर्ण ब्लॉग.
माझा ब्लॉग: www.tuljabhavani.in
टिप्पणी पोस्ट करा