...आता नको मशाली!!
माझेच बिंब जेव्हा मज मागते खुशाली
तडकून आरसाही, होतो उगा सवाली
काळी धरा कधीची, आसूसली सरींना
दुष्काळ नीयतीने लिहिला तिच्याच भाळी/ली!!
पदरात पाखरे, 'ती' मागीत भीक होती
पदरास ढाळले अन, गरिबीच दूर झाली!!
जनजागृती अताशा, वृत्तात होत नाही
अपघात, खून अन घोटाळेच होत वाली..
तलवार पेटुनी ही, उठते नको तिथे का?
दावीत धार अपुली "विद्यालयास" जाळी..??
देशास दंशण्याला, बसलाय सर्प काळा
फ़ुत्कारुनी विषाच्या, तो वाहतो पखाली!!
अन्याय सोसण्याची, जडली सवय अताशा
वाटे न गैर काही, आता नको मशाली!!
- प्राजु
2 प्रतिसाद:
अप्रतिम! " उष:काल होता होता कालरात्र झाली. "ची आठवण झाली.
उष:काल मन पेटवून सोडत असे. तू असा हताश ,अगतिक सूर का लावला आहेस ?
तरीही मन अस्वस्थ करण्याच काम तर तू केलेलच आहेस.खूप, खूप, खूप सुन्दर.! खुपच आवडली.
असच पुन्हा पुन्हा वाचायला मिळत राहील ही आशा करतो.
एकच विचारायच आहे. दुसर्या चरणाच्या शेवटी जो "ली " जोडलेला आहेस त्याच प्रयोजन नाही समजल.! खाताकतो तो.! कदाचित मलाही नीटसा अर्थबोध झाला नसेल.!
धन्यवाद आणी शुभेच्छा.!
पदरात पाखरे, 'ती' मागीत भीक होती
पदरास ढाळले अन, गरिबीच दूर झाली!!
मनाला चटका लावणा-या , वास्तव मांडणा-या ओळी....
टिप्पणी पोस्ट करा