शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

वादात या कुणीही सहसा पडू नये!!

आयुष्य फ़क्त माझे, तू लुडबुडू नये..
वादात या कुणीही सहसा पडू नये!!

दीपा परी जळावे, आयुष्य आपुले
पण कापरा परी ते, नुसते उडू नये

दाखव करून काही, हाती तुझ्याच जे
नुसते उथळपणाने, तू बडबडू नये

नुकती वयात आली, नाजूक ती कळी
"देवा, तिला कुणीही, तोडू -खुडू नये!!!"

काट्यापरी रूतावे, ऐसेच भाव तर
डोळ्यांत त्या जराही आपण बुडू नये..

थोडी फ़ुलून ये ना, राणी अता जरा
मौनात या तुझ्या गं, प्रीती दडू नये..

मजला खुणावती त्या, क्षितिजा वरी दिशा
माझेच पंख कोणी, कृपया खुडू नये..

- प्राजु

1 प्रतिसाद:

Ganesh Bhute म्हणाले...

नुकती वयात आली, नाजूक ती कळी
"देवा, तिला कुणीही, तोडू -खुडू नये!!!"


थोडी फ़ुलून ये ना, राणी अता जरा
मौनात या तुझ्या गं, प्रीती दडू नये..


मजला खुणावती त्या, क्षितिजा वरी दिशा
माझेच पंख कोणी, कृपया खुडू नये..


-- खूप आवडल्या ह्या ओळी... खूप सुंदर !

Page copy protected against web site content infringement by Copyscape