मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११

अव्यक्ताचे नवथर गाणे..

भिजला अवघा शुभ्र पसारा,
झरतो पागोळ्यातून खाली
कोमल श्यामल किरणांमधुनी
लखलख करती हिम-शाली

गोठून गेला रवी आळवी
अव्यक्ताचे नवथर गाणे
चैतन्याच्या उन्हांत कोवळ्या
सृष्टीचेही सचैल नहाणे

राग अनवट सारंगाचा
लाजून गाते फ़ूल-पाकळी
ऋतूराजाचे स्वागत करण्या
नटे पालवी नवी नव्हाळी

रंगबावरे रान मोकळे
नवरंगांची हिरवी वस्ती
कडे-कपारी, वेळू मधुनी
वार्‍याची ही खुशाल मस्ती

दिसती अवखळ तुरे चिमुकले
नाजूक इवल्या शाखेवरती
सृजनाचा हा भव्य सोहळा
दहा दिशा त्या गाती-हसती..

- प्राजु

1 प्रतिसाद:

Ganesh Bhute म्हणाले...

दिसती अवखळ तुरे चिमुकले
नाजूक इवल्या शाखेवरती
सृजनाचा हा भव्य सोहळा
दहा दिशा त्या गाती-हसती..

- सुंदर !

Page copy protected against web site content infringement by Copyscape