वनराणी..४
या घटनेला एक मास लोटला असेल आता. पण अजूनही ती घटना आठवली की पाय डळमळू लागतात. पण मी हळूहळू रुळलेय इथे. इथल्या तरूवेलीत, गाई-वासरांत, हरणांमध्ये माझे सवंगडी भेटलेत मला. जे आहे .. त्यात खूप समाधान आहे मला. इथे अशीच राहिले मुनीवरांच्या छायेत, तरी माझं अयुष्य स्वर्ग होईल. ज्या दिव्यशक्तीने हे सगळं घडवून आणलय, तीच मला या सगळ्यातून तारून नेईल.
*********
पुढे वाचा ...
आता या सगळ्याचीच सवय झालीये मला. आयुष्यात म्हंटलं तर काहीच बाकी नाही राहिलेलं आणि म्हंटलं तर खूप काही आहे. साक्षात परमेश्वराच्याच सान्निध्यात आहे मी. पण मनांस कसली तरी ओढ आहे. नक्की कशाची.. सांगता येत नाहीये. मुनी म्हणतात की, मी वेगळी आहे.. माझ्यावयाच्या इतर मुलींपेक्षा! पण काय विचारलं तर सांगत नाहीत.
इथलं राहणं वेगळं, वावरणं वेगळं! दिवस अशा भुर्कन उडून जातो. आता इथे असणारे, विद्या ग्रहण करणारे बरेचसे शिष्यगण माझ्याशी नीट बोलू लागले आहेत. मी ही माझा दिनक्रम ठरवून घेतला आहे. सुर्योदयापूर्वीच उठून स्नान उरकून, आश्रमाची झाड लोट, सडा, गोशाळेची स्वच्छता, सर्व शिष्यांच्या स्नानासाठी गरम पाणी.. जितकं जमेल तितकं करत राहते. मग पाठशाळा सुरू झाली की कांचनाच्या झाडाखाली बसून राहते. माझ्या , त्यांच्या समोर जाण्याने त्यांच्या विद्या ग्रहणात विघ्न येईल का अशी भिती वाटत राहते. मुनींनी मला इथे आश्रय दिला .. पण माझ्या चुकीच्य वागण्याने त्यांना किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांना कमीपणा नको यायला. हो ना? कसं असतं ना मनुष्याचं मन !! कधी कधी जे आहे त्यात समाधानी होतं तर कधी कधी आणखी प्राप्त करण्याची आस लागते. एक संवत्सर लोटलं असेल मला इथे येऊन. पण मला काय हवंय समजतंच नाहीये. खूप विचार करतेय नक्की काय चाललं आहे माझं? मा'ची आठवण होते, बां'ची आठवण होते. कसे असतील ते? माझी आठवण त्यांना होत असेल?? की अजूनही माझा राग धरून बसले असतील. नक्कीच रागावले असतील अजून .. त्यांची जखम खूप मोठी आहे आणि खोलही आहे. इतक्या लवकर कसे क्षमा करतील ते मला!! चंपा!! ती कशी असेल?? तिचा विवाह झाला असेल का? कोणाशी झाला असेल?? घासू शी झाला असेल बहुधा. त्याला ती आवडायची ना!! चंपा... माझी सखी..!
चंपा वरून आठवलं! काल मी अरण्यात गेले होते काही सुकलेल्या वाळलेल्या काड्या-काठ्या आणायला. तर साधारण माझ्याच वयाची एक मुलगी अगदी चंपा सारखीच.. अगदी मन लावून मोहाची फ़ुलं वेचत होती. खूप सुंदर होती. लांब सडक केस. गोरीपान. तिचे हात नाजूक, बोटं निमुळती!! एखादी परीच असेल. तिने ल्यायलेल्या त्या शुभ्र वस्त्रात ती इंद्रलोकीची अप्सरा वाटत होती. वाटलं मी तर भिल्लच आहे.. पण ही.. इतकी कोमल कन्या.. इथे या दाट अरण्यात काय करते आहे?? माझी परडी सांभाळत मी तिच्या जवळ गेले. माझी चाहूल लागताच तीने वर पाहिले.. थोडी बावरली. मग हळूच हसली. मी तिच्याशी काही बोलावं का असा विचार करत असतानाच "माझं नाव केतकी. देवेन्द्र ऋषींची मी कन्या. तू कोण आहेस?" बोलता तिने मानेला हळूच झटका दिला, त्यने तिच्या कानाशी खोवलेले लाल चुटुक जास्वंदीचे फ़ूल एकदम खाली पडले.. आणि ते पाहून दोघीही हळूच हसलो. मी तिला माझी ओळख सांगितली. मग दोघी मिळून पुन्हा झाडापाडातून हिंडलो. कंद गोळा केले, मोहाची फ़ुले जमवली, हरणांच्या मागे धावलो. खरंच एक खूप छान सखी भेटली मला.
"अगं साऊ... थांब गं! गोर्हा.. थांब गं पिलू जरा!" या साऊचाच लळा इतका पट्कन लागला मला. मी उठलेली हिला समजतं , की लगेच ही देखिल उठून बसते गोठ्यांत. माझं स्नान उरकायच्या आधी हिचा गोठा स्वच्छ करून घ्यावा लागतो. नाहीतर ही गोर्हा अवखळपणा करून , उड्या मारून रात्रभर साचलेल्या गोमुत्र आणि गोमयामध्ये अख्खी बरबटून घेते. लहान आहे ना अजून! साऊची धार काढायचं काम मी माझ्यावर घेतलंय. साऊच्या डोळांवरून समजतं मला. लकडू जेव्हा सगळ्या गुरांसोबत हिला बाहेर घेउन जातो तिकडे डोंगरावर, तेव्हा गोर्हाला मी ठेऊन घेते इथेच. नाहीतर गोर्हा साऊला चरूच देत नाही. पान्ह्याल तरी लागलेली असते नाहीतर वार्यासारखी इकडे तिकडे धावत असते. लकडू अगदी हैराण होतो.
गोशाळेच्या मागच्या बाजूला, छोटासा मळा फ़ुलविला आहे. रोजच्या भोजनासाठी लागणारी भाजी, काही फ़ुलझाडे आहेत त्या मळ्यात. वेलीवरच्या शेंगा आहेत. अगदी धोतर्यापासून जाई-जुई , कुंदा.. खूप फ़ुले आहेत. एका बाजूला अबोलीचंही झुडुप आहे. का कोणास ठावूक पण इथे आले की नकळत मी या अबोलीकडे खेचली जाते. किती सारख्या आहोत ना आम्ही दोघी! काट्यांमध्येच जन्माला यायचं आणि काट्यांमध्येच मरून जायचं. उभं आयुष्य रखरखीतच. मुनीवरांनी आश्रय नसता दिला तर पूर्णेच्या काठावर जन्मभर रहावं लागलं असतं, आणि कदचित मी राहिलेही असते तशीच हाल-अपेष्टा सोसत.. !!कारण हे आयुष्य मीच माझ्यासाठी निवडलेलं आहे. भोराशी विवाह झाला असता तर कदाचित आतापर्यंत एखादं अपत्यही झालं असतं. नियतीही काय खेळ खेळत असते ना! सगळं आधीच लिहून ठेवलेलं असतं. आपण फ़क्त त्यानुसार वागत जातो इतकंच! माझ्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवले आहे, हे मुनींना नक्की समजले असेल. मग कसली ही परिक्षा घेताहेत ते?? मी वेगळी आहे म्हणाले, मग का वेगळी आहे, कशी.. हे का नाही सांगत आहेत मला? नियती म्हणजे काय..? निसर्ग!! निसर्ग म्हणजे चराचर!! मुनी म्हणतात 'चराचरामध्ये परमेश्वर आहे." मग तो मला का नाही भेटत. मला त्याला भेटायचं आहे, त्याची सेवा करायची आहे.. त्याच्या चरणी स्वत:ला अर्पण करायचं आहे. हो..!! हीच तर आस लागलीये मला. माझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय हेच तर नसावं?? खूप प्रश्न.. खूप खूप..!! उत्तर मात्र एकाचंही माझ्याकडे नाहीये. आणि ते मिळत नाहिये म्हणून मन अशांत आहे.. अस्वस्थ आहे.
भोजनाची वेळ झाली वाटतं. उठून जावं आणि पान घेऊन यावं. "साऊ आलेच मी हं! मग दोघी सोबतच घेऊ भोजन."
आश्रमाच्या पाकगृहात मी अजून प्रवेश नाही केला आहे. वासंतिका ..!! मनू ऋषींच्या अर्धांगिनी, गुरूभार्याच म्हणायला हवं वास्तविक!; त्या पाकगृह सांभाळतात. माझं भोजन पत्रावळीवर वाढून ठेवतात.. मग मी आणि साऊ दोघी भोजन करतो. मुनीवरही आवर्जून विचारपुस करतात माझी. काय कमी आहे इथे? काहीच नाही. मा', बा' तुम्ही दोघे एकदा येऊन बघा.. तुमची शबरी इथे एका ऋषींच्या आश्रमात राहते आहे. रोजचे स्त्रोत्रपठण ऐकते आहे. आप, तेज, पृथ्वी , वायू, आकाश या पंचमहाभूतांच्या साक्षीने तिच्या आयुष्याचं ध्येय शोधते आहे.
क्रमश:
1 प्रतिसाद:
कल्पनाविस्तार छान केला आहेस.
टिप्पणी पोस्ट करा