शुक्रवार, १० जुलै, २००९

म्हातरपण!!! नको गं बाई..

अजून बस आली नव्हती.. आम्ही सगळ्याजणी आपापल्या मुलांना घेण्यासाठी त्या स्कूलबसच्या पिक-अप- ड्रॉप ऑफ स्टॉप वर उभ्या होतो. इतक्यात बस आलीच. लेकाच्या वर्गात आमच्या कॉम्प्लेक्स मधली ४ जणं आहेत. आणि शिवाय के जी च्या दुसर्‍या वर्गात असणारी आणखी ५-६ जण आहेत. बसमधून उतरल्या उतरल्या हे सगळे केजी'कर इतका चिवचिवाट करत असतात.. आपल्या बॅगा आयांच्या ताब्यात देऊन हे सगळे मस्त बागडत कुठे झाड्याच्या वाळलेल्या काठ्या गोळा कर, कुठे फुले तोड.. कुठे पेबल्स गोळा कर.. असं करत करत , शाळेत काय झालं हे सांगण्याची अहमहमिका लावत हे सगळे उड्या मारत घरी जातात. पण आज.. सगळंच शांत होतं. थोडं आश्चर्य वाटलं. पण आज शाळेत डॉक्टर्स विजिट होती. मुलांना मेडीकल इक्विपमेंट्स , स्टेथोस्कोपने हृदयाचे ठोके मोजणे, स्वतःच्या बोटावर छोटेसे प्लास्टर करणे इ. गोष्टीं ची ओळख आणि माहिती होणार होती. त्यामुळे थोडी कंटाळली असतील मुलं असं वाटलं.

घरी आल्या आल्या लेक उदासच वाटत होता. मी छेडलं तर म्हणाला.. "आय एम टायर्ड.." मी पण सोडून दिलं.
त्यानंतर रात्री झोपण्या आधी लेक मला म्हणाला," तू किती यर्स ओल्ड आहेस?" तो नेहमीच त्याच्या आणि माझ्या वयाची तुलना करत असतो आणि शेवटी म्हणतो,"मी कधी होणार तुझ्या इतका मोठा.." हे माहिती असल्यामुळे मी लग्गेच म्हणाले,"मी ३० यर्स ओल्ड आहे.." तर एकदम आनंदाने म्हणाला..." म्हणजे तू म्हातारी नाहीयेस... येऽऽऽऽ!! तू म्हातारी नाहीयेस ना आई??" त्याच्या चेहर्‍यावर खूप आनंद दिसत होता. मी म्हणाले,"नाही.. मी अजून तरी म्हातारी नाहीये." मग एकदम म्हणाला ," तू अज्जिबात व्हायचं नाहीस म्हातारी.." मी कामात होते त्यामुळे फक्त ,"बर!!" असं म्हणून विषय सोडून दिला.
आणखी काही दिवसांनी एकदम बूट घालता घालता म्हणाला, "तू अज्जिबात म्हातारी व्हायचं नाहीस, आय डोण्ट वॉन्ट यू तू हॅव ग्रे हेअर..!" कशाचा काही संदर्भ नसताना असं बोलला मला थोडं नवल वाटलं. बूट घालताना एकदम काय आठवलं याला? पण विषय फार नाही वाढवला. मला वाटलं की, म्हातारी झाल्यावर मी कदाचित चांगली दिसणार नाही असं त्याला वाटत असावं आणि म्हणून हा असं म्हणतो आहे. एकदा वाटलं त्याला सांगावं की, हे असं काही नसतं मी काही लग्गेच वाईट नाही दिसायला लागणार. पण तो विचार मी झटकून टाकला कारण असं सांगितल्यानंतर पुढे येणार्‍या प्रश्नांची भिती वाटली मला.

असंच एकदा तो सोफ्यावर उड्या मारत होता. मी तिथेच बसले होते. मी म्हणाले, "अरे माझ्या पाठीवर वगैरे पडशील.. माझी पाठ दुखेल ना. " असं म्हंटल्याबरोबर हा थांबला आणि म्हणाला, "म्हणजे पणजी आज्जी सारखी तू खाली वाकून चालणार का मग??" (माझी आजी सधारण २ वर्षापूर्वी गेली.. ती शेवटी शेवटी वाकलेली होती.. आणि त्याला ती अजूनही आठवते.) मी म्हणाले.."पणजी आज्जी म्हातारी होती.. म्हणून वाकून चालत होती." लग्गेच निर्वाणीच्या सुरात सांगितलं मला,"तू अज्जिबात म्हातारी व्हायचंच नाहीयेस ". पुन्हा मी बुचकळ्यात. विचारलं "तुला कुणी सांगितलं हे सगळं?" तर म्हणे, "स्कूल मध्ये एकजण आहे तो म्हणाला.." मुलामुलांत काहीतरी असं बोलणं झालं असावं असा समज झाला माझा.
एकदा रात्री झोपेतही असंच काहीसं बडबडत होता. मग मात्र मी सटपटले.. मला कळेना काय याच्या डोक्यात आलंय हे एकदम. असा का म्हणतो आहे सारखं सारखं? पण त्याच्यापाशी विषय वाढवण्यात अर्थ नव्हता. प्रभू मास्तरांना मी व्य नी ने ही समस्या सांगितली. त्यांनी सांगितलं," सध्या काहीच नका करू, पण तुमचा एकही केस पांढरा होणार नाही याची काळजी घ्या." हरकत नाही. काही दिवस ठीक होते. शाळा बंद झाली.. सुट्ट्या सुरू झाल्या. आता या विषयाबद्दल शाळेत जाऊन चर्चा तरी कुणाशी करणार?

एकदा तो जेवत होता, मी म्हणाले,"चल, संपव लवकर तू बीग बॉय आहेस ना? आता फस्ट ग्रेड ला जाणार ना तू.. मोठा झालास आता. मग लवकर जेवायला नको का?" लग्गेच प्रश्न आला,"मी फस्ट ग्रेड ला गेल्यावर तू कशी होणार?" मला प्रश्न नाही समजला. म्हणाले, "कशी होणार म्हणजे?". तर म्हणाला,"तू पण मोठी होणार का?" ... मला कळेना आता काय उत्तर द्यावं. मी म्हणाले," हो थोडीशी.." तर लग्गेच.." म्हणजे थोडीशी म्हातारी होणार का?" त्याच्या प्रश्नाचा रोख समजला. मी म्हणाले,"मनू.. म्हातारी लग्गेच कशी होईन? तू हळूहळू मोठा होशील तेव्हा मी हळूहळू म्हातारी होईन.." ... एकदम डोळ्यांत त्याच्या पाणी आलं... आणि रडत रडत म्हणाला," मी नाही जाणार फस्ट ग्रेड ला. आय डोन्ट वॉन्ट टू बीकम बीग बॉय्..मी मोठा नाही होणार..... " मला खूप वाईट वाटलं. म्हणाले.. "बर असूदे.. मी नाही होत म्हातारी.. ओके??" .. त्याला जवळ घेऊन जेवण त्याचं पूर्ण केलं. पण आता माझ्या डोक्यातून हा किडा जाईना..

एकेदिवशी मैत्रीणीकडे गेले होते. हा विषय आता पर्यंत मी काढला नव्हता कोणापाशी. पण तेव्हा मात्र काढला. तेव्हा समजलं ते असं.. तिचा मुलगा सुद्धा तिला विचारत होता,'आजि-आजोबा म्हातारे आहेत का?' तिने 'हो' असं सांगताच तो एकदम रडायला लागला. तिने विचारताच, 'नाऊ दे आर गोईंग टू डाय..." असं म्हणत तो पुन्हा रडायला लागला. मी माझ्या बाकीच्या मैत्रीणींकडे चौकशी केली तर थोड्याफार फरकाने सगळ्यांच्याकडे हाच सीन होता. त्यातल्या एकीकडे ही रडारडी खूपच झाली होती. तीने शाळा संपायच्या आधी शाळेत जाऊन चौकशी केली होती तेव्हा समजलं.. डॉक्टर्स व्हिजिट शाळेत होती तेव्हा इतर माहिती सोबत त्यांना ह्युमन लाईफ सायकलची सुद्धा थोडी माहिती सांगितली होती. बर्थ टू डेथ. ह्युमन बॉर्न, दे ग्रो... दे बिकम ओल्ड आणि फायनली दे डाय...!! ................... एकदम ट्युब पेटली. मी याला म्हातारी व्हायला नको आहे... कारण मी म्हातारी झाल्यावर मी मरणार अशी भिती त्याला वाटते आहे... काय करू मी?? कारण हे डोक्यातून काढणं अवघड होतं. तसं काही नसतं असं सांगितलं तर स्कूल मध्ये मग खोटं का सांगितलं असं विचारणार हा.. आणि हे खरं आहे असं सांगितलं तर.. पुढची रडारडी अटळ होती आणि काय माहिती किती दिवस आणखी हेच डोक्यात घेऊन बसला असता?

मनांत आलं, 'लहान मुलांना इतकं जपणारी यांची अमेरिकन संस्कृती.. पण मग ५-६ वर्षाच्या मुलांना ह्युमन लाई सायकल सांगायची काय गरज होती. मला खात्री आहे की, आमच्याच नव्हे तर अमेरिकन मुलांच्या घरातही थोडेफार अशी रडारडी झालीच असणार. याची कल्पना त्या डॉक्टर्स ना नसावी का? शाळेच्या पहिल्या दिवशी भेट म्हणून दिलेल्या गोष्टीच्या पुस्तकात कुठेतरी 'मॉन्स्टर किल्ड द काऊ..' असं वाक्य आलं तर शाळेने ती पुस्तकं परत मागवून घेतली होती..का? तर मुलांच्या मनावर किल्ड सारखे शब्द फार परिणाम करतात.. मग हे तर त्याहून भयानक होतं. हे समजलं नसेल का शाळेला? की शाळेने आपलं काम केलं डॉक्टर्स च्या व्हिजिटचं आणि डॉक्टर्स नी आपलं काम केलं !!! नक्की काय समजायचं??

त्याबद्दल काहीही विषय मी काढला नाही. मध्ये बरेच दिवस गेले.. मला वाटलं हा विसरला असेल. पण नाही!! पुन्हा एकदा प्रश्न आलाच.. "तू म्हातारी नाही ना होणार?" सावध पवित्रा घेऊन मी म्हणाले, " मनू.. तू भरपूर भरपूर मोठा होईपर्यंत मी अजिबात म्हातारी होणार नाही. " ... चेहरा थोडा उजळला त्याचा." प्रॉमिस???"....... माझ्याही नकळत मी..."प्रॉमिस्स!" म्हणून गेले.

(बहुधा समाधान झालं असावं... बघूया पुढे काय होतं ते!!)

- प्राजु

3 प्रतिसाद:

भानस म्हणाले...

प्राजु, खरचं गं लहान मुलं अशा गोष्टी फार मनात खोल धरून राहतात. अग अजून थोडा मोठा झाला की बरेच अनुभव येतीलच. आम्ही इथे आलो ना त्यावेळी माझा लेक सहावीत होता. आल्याच्या आठव्या दिवशी स्त्री-पुरूष संबंध- गर्भ कसा राहतो पासून मूल कसे होते पर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्लाईडस, व्हिडीओ सकट सायंटीफीक रीत्या शाळेत पाहीली. आता तू कल्पना कर काय काय प्रश्न त्याला पडले असतील आणि त्याची उत्तरे देता देता माझा मेटाकुटीला आलेला जीव...:)
बरेच दिवसात ऒर्कुटवर दिसली नाहीस...?

प्रशांत म्हणाले...

लहान मुलांच्या निरागस प्रश्नांना उत्तर देणं खरंच कधीकधी खूप कठीण होऊन बसतं.

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

आत्ताच वाचला लेख तुझा...खूपच सुंदर लिहीला आहेस नेहमीप्रमाणेच...
एकदम मला जुनी आठवण करून दिलीस...२५ वर्षापुर्वी रुचिर-शिशिर ने मला असेच भंडावून सोडले होते की सगळे एकेकटे येतात मग आम्ही दोघे एकदम कसे आलो...हेहे...आता काय उत्तर देणार....मी प्रसंग तुझ्यासारखा लिहून ठेवला नाहीये पण मनांत जरूर घर करून आहेत असले प्रश्न...
खरंय...अशा अनेक प्रसंगांना तुला तोंड द्यावंच लागणार आहे..कारण आजकालची पीढी तर संगणक डोक्यात बसवूनच आली आहेत....जे की आमच्या मुलांमधे नव्हते...हेहे...असेच आम्हा सगळ्यांना अशा प्रश्नांची ओळख करून देत रहा..
शाब्बास...

Page copy protected against web site content infringement by Copyscape