बुधवार, २४ डिसेंबर, २००८

वामा..

वामा- स्त्री.डाव्याबाजूला (पुरूषाच्या) असते ती, खास करून कलश पूजन करताना..(वामा म्हणजे रूक्मिणी ..)

जगत-जननी, माता, भगीनी
बंध नवे तू जोडीत ये
घेत भरारी क्षितिजाशी त्या
नवे नाते जोडीत ये

अलका, अचला, कोमल गंधा
अभिसारीका झळकत ये
विश्वस्वरूपा, दुर्गा, अंबा
अग्निशलाका तळपत ये

स्नेहसुमना, अधोवदना
कमल नयना अलगद ये
मौक्तिक मुक्ता, रूप कांचना
सुवर्णलता उमलत ये

चाल हंसिनी, रूप कामिनी
विश्वमोहीनी , सजून ये
गजगामिनी, दिप्ती दामिनी
चंचल हरिणी, बनून ये

रण चंडीका, मुंड मुंडीका
दैत्य दंडीका, जिंकूनी ये
जगतकारिणी, गर्भ धारिणी,
दु:ख सोषिणी, होऊन ये

रूप गर्विता, तनू अर्पिता
झुळझुळ सरीता, फ़ुलवित ये
लीन रुजूता, मूक नम्रता
जीव अमृता, शिंपित ये

गीत माधुरी, श्याम बासरी
सूर आसावरी, छेडीत ये
शुभ्र मोगरी, कृष्ण मंजिरी
रंग शर्वरी, खुलवित ये..

- प्राजु

अलका - लक्ष्मी, अचला - अढळ असलेली, ठाम..
शर्वरी - पहाट..

1 प्रतिसाद:

Meenal Gadre. म्हणाले...

nstiवामा चा अर्थ सांगितल्याबद्दल आभार.माझ्यासारख्या अज्ञानी लोकांकडून येणारे प्रश्न टळले.

कविता वाचल्यावर कुसुमाग्रजांच्या काही काव्यपंक्तींची आठवण झाली. म्हणजे लेखनाचा प्रकार!
पण `वामा`ही कविता वेगळ्या अर्थाची आहे.

ब-याचदा स्त्री म्हणजे `अबला` समजली जाते. पुरूषप्रधान भारतात स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण जास्त आहे.
त्या पार्श्वभूमीवर ही कवीता `स्त्री`ला आमंत्रण देणारी आहे.
कवयित्री आग्रहाने तीला बोलावते आहे.``तू ये.``
``तू तशी आहेसच.नसशील तर तू अशी अशी बनून ये.``
:
:
कशी ??????????
:
:

अवनी ( ही पण स्त्री च बरं का!)जशी क्षितीजातर्फे उंच असाध्य अश्या ही आकाशाशी नाते जोडते तशी तू नाती जोडणारी /जपणारी होऊन ये.तूझ्या जन्माने विविध नाती जोडली जाणार आहे. तू बहिण होशिल.त्याच बरोबर नविन जन्म देणारी माता ही होशील.विविध नाते, स्नेह संबंध तू जोडत ये.
दूष्ट दानवांचा नाश करणा-या दूर्गा,अंबा ,लक्ष्मी, चंडिका यासारख्या शौर्यवान शक्तीशाली स्त्री सारखी तू विजयी होऊन (दामिनीसारखी )विजेसारखी लखलखत ये. दूर्गुणांचा अंत करण्याच सामर्थ्य तूझ्यातही आहे.
पण त्याच बरोबर तू नाजूकश्या प्रेमाने गंधित होऊन कोमलतेने अलगद ये. तू तूझा बालिशपणा सोडू नकोस. चंचल हरिणीसारखी अवखळ होऊन ये.येथे विरोधाभास उत्तम साधला आहे.
अजून असे काही विरोधाभास आहे पहा.---
सजून धजून सुंदर रूप घेऊन त्या रूपाचा संपूर्ण जणिवेने या सर्व जगाला मोहीत करण्यासाठी तू गर्वाने ये.पण (लीन रुजूता, मूक नम्रता---) उन्मत्त होऊ नकोस.लीनता /नम्रपणा मात्र सोडू नकोस.
मुंड मुंडिका म्हणजेच मारणारी . आणि गर्भ धारिणी म्हणजे जन्म देणारी .येथे ही उत्तम विरोधाभास आहे.
आपले शरीर अर्पून त्या त्यागाने आनंदाची (सरिता)नदी तू फुलवत ये. गर्भधारण करण्याची तूझी क्षमता आहे. पण जग निर्माण करताना त्यात दु:ख सोसण्याच्या तयारीनिशी ये.
तनु अर्पिता--आपण देवाला फुल, नैवेद्द वगैरे अर्पण करतो तेव्हा ज्याला अर्पण करतो त्याच्या बद्दल प्रेम ,आदर आणि श्रध्दा असते.इथे शरीराचा उल्लेख करतानाही अर्पिता ह्या शब्दामुळे तेच पावित्र्य राखलेले दिसते आहे.
दु:ख सोषिणी--- जीव निर्माण करताना होणा-या वेदनांची कल्पना तुला आहे. ती सहन करण्याची ताकद तुझ्यात आहेच.त्या ताकदीने ये.

मौक्तिक मुक्ता, रूप कांचना
सुवर्णलता उमलत ये
येथे सुवर्ण लतिका अधिक शोभले असत असं वाटत.

पहाट जशी नवी आशा ,उमेद ,उत्साह घेऊन येते तशीच तू `सारे जिवनरंग खुलवत ये `अशी आर्जव शेवटी केली आहे..
इथे `आसावरी `या चार अक्षरांच्या शब्दापेक्षा तीन अक्षरी शब्द ठेक्यात अधिक चांगला बसला असता.

ही जी वामा आहे ती सच्ची आहे.सच्ची म्हणजे खरी खुरी.आपल्या आजबाजूला आईमधे, बहिणीमधे, प्रेयसीमधे ,पत्नीमधे ,लेकी मधे आपण पाहिलेली आहे.
त्यामुळे कुठेही अतिरंजिकता, अतिरेक वाटत नाही.खरी वाटते. नव्हे ,नव्हे आहेच.
या आमंत्रणात जिला आमंत्रित केले आही ती देवी /देवताच असायला हवी असे नाही.
प्रत्येक स्त्रीच तशी असते. अशी खात्री कवयित्रीला आहे असे स्पष्ट होते आहे.
प्रत्येक शब्दात सकारत्मकता आहे. नकरात्मक शब्दांचा कधीही वापर केलेला नाही.

अनुरूप उदाहरणांचा अचूक उपयोग केला आहे.
'उपमान' म्हणजे ज्याची उपमा दिली जाते ते, आणि 'उपमेय' म्हणजे ज्याला ती दिली जाते ते.
अभिसारिका,अग्निशलाका,सुवर्णलता,हंसिनी,कामिनी,गजगामिनी, दिप्ती, दामिनी,सरीता,हरिणी,आसावरी, बासरी , मोगरी,मंजिरी,शर्वरी अशी सर्वच्या सर्व स्त्री वाचक उपमान आहेत.वामा हे उपमेय ही स्त्रीलिंगी. म्हणूनच एकमे़कांशी अनुरूप आहेत.

शब्द, रूपक, प्रतीक आणि प्रतिमा यांचा उत्तम मेळ जमून अर्थपूर्ण अप्रतिम काव्य तयार झाले आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape