शुक्रवार, १९ डिसेंबर, २००८

एक होता पिझ्झा..

डिक्लेमर : ज्यांना पिझ्झा आवडतो आणि करायची इच्छा आहे त्यांनी आवर्जून वाचावे आणि ज्यांना आवडत नाही पण करायची इच्छा आहे त्यांनी ही वाचावे पण ज्यांना दादरच्या प्रकाश हॉटेलमधील भाजणीचं थालीपीठच फक्त आवडतं... त्यांनी जमले तर वाचावे.. म्हणजेच काय ज्यांना वाचायचे त्यांनी वाचावे.. पण यातील घटनांशी तुमचा संबंध आहे असे जाणवले तर लेखिकेला नक्की विचारावे..

मंडळी,लहानपणापासून तशी मला कुकिंगची (स्वयंपाकाची नव्हे) भारी आवड. तसंही सध्याची एक नंबरची सुगरण ठरले आहे मी..(काय म्हणालात...कोणी ठरवलं??........... ते ... .. हां.. मीच ठरवलं आहे ...)तर.. सांगत काय होते की मला कुकिंगची लहानपणापासून आवड. ... त्यामुळेच नेहमी स्वयंपाक घराबाहेर बसून मी आईला, आजीला, आणि नंतर स्वयंपाक करणार्‍या बाईना मी नेहमी सुगरणीचे सल्ले देत असे... खरंतर स्वयंपाक ही एक कला असते असं संजीव कपूर म्हणतो. त्याचंही बरोबर आहे कलेची कदर करणारी (तीही लाखांमध्ये) हॉटेल वाली मंडळी भेटली की, अगदी सुरी हातात कशी पकडावी ही सुद्धा कलाच वाटू लागते. पण या कलेला माझ्या कलाने घेणे म्हणजे एक दिव्य आणि त्यानंतर तयार झालेल्या कलाकृती चा आस्वाद घेणे हे दुसरे दिव्य. असो.. तर अशी मी ती कलाकार एकदा कला सादर करावी म्हणून त्या कलादालनात... आपलं स्वयंपाक घरात गेले... आईने सांगितले होते गूळाचा सांजा कर म्हणून. मी कॉलेजला असतानाची ही गोष्ट. तिला विचारलं "रवा कुठं आहे?" ती म्हणाली रॅक वर मधल्या कप्प्यात स्टीलचा लहान डबा आहे.. मी शोधला. रवा घेतला.. मस्तपैकी तूपात परतून गूळ घालून, पाणी घालून शिजवला आणि वरून पुन्हा साजूक तुपाची धार सोडून आपण जरा जास्तच चांगला केला सांजा या आविर्भावात होते.. नंतर समजले ज्या रव्याचा सांजा केला होता तो इडली रवा होता.एकदा कधीतरी दिवाळीच्या दरम्यान आई चकल्या करत होती. खाली बसून तिने १२-१५ चकल्या करून घेतल्या आणि ओट्यावरच्या शेगडीवर कढईत तेल तापत ठेवले होते त्यात त्या तळून काढणार होती.. मी तिथे काय करण्यासाठी कडमडले आठवत नाही.. पण नेमके तेव्हाच आईने सांगितले, " जरा कढईतलं तेल तापलं का बघ गं.." मी म्हणाले "हो.." आणि नंतर... आईला फक्त माझ्या किंचाळण्याचा आवाज आला.. कारण मी हातची ४ बोटं तेलात घालून तेल तापलं का हे पाहिलं होतं. ती दिवाळी माझी बोटांवर निभावली..

तेव्हापासून मी माझी कला सादर करणार म्हंटलं की, सगळे जण घाबरून बसायचे. लग्ना नंतर माझा स्वयंपाक नवर्‍यापेक्षा सासूबाईंनाच जास्ती आवडू लागला. नेमकं नवर्‍याला मीठ कमी आहे असं वाटलं की, सासूबाई म्हणायच्या "मस्त झाली आहे भाजी.." नंतर समजलं.. सासूबाईंना बीपी आहे आणि मीठ कमीच खायचे आहे..त्यातही नेहमीच्या स्वयंपाकापेक्षा इटालियन, मेक्सिकन, चायनीज या अशा पदार्थांकडे जास्ती ओढा. एक मात्र होत होतं.. या पदार्थांपैकी एकही पदार्थ त्यावेळी घरच्या इतर कोणी विशेष खाल्ला नसल्याने किंवा घरी करायचा प्रयत्न केला नसल्याने मी करेन ते उत्तम असचं होतं..

पिझ्झा हा प्रकार तसा भारतात फार पटकन प्रिय झाला. जस जसं त्याचं कौतुक कानावर येत गेलं तसतसा तो खाण्याची इच्छाही प्रबळ होत गेली. आणि आचानक कोल्हापूरातल्या राजारापुरीतल्या हिंदुस्थान बेकरी मध्ये पिझ्झा मिळतो असं कानावर आलं. मोर्चा वळवला हिंदुस्थान कडे. तिथे गेल्यावर पाहिलं तर तिथे बर्गर, व्हेजी पफ्फ.. या आणि अशा प्रकारच्या अनेक पदार्थांनी वर्णी लावली होती.. पिझ्झाही होता. त्यावेळी कोल्हापूरात पिझ्झा असा कुठे मिळत नव्हता त्यामुळे पहिल्यांदाच खात असलेला तो पिझ्झा.. म्हणजे भरपूर चीज आणि काही भाज्या .. आणि पॉप अप टोस्टर मधून काढलेला कडक ब्रेड टोस्ट.. असा जोरात चावून खाटकन आवाज करत आणि नको इतके गरम असलेले ते चीज टाळ्याला पोळवत आम्ही "वॉव.. सह्ही.. " असं म्हणत पोटात ढकलला.. .. पुढे पुण्यात आल्यावर पिझ्झा हट मध्ये ( तेव्हा फक्त जे एम रोड वरच होतं ते)एकदा पिझ्झा खाल्ला आणि पिझ्झा पिझ्झा म्हणतात तो असा असतो आणि तो खरंच चांगला लागतो असा दृष्टांत झाला. नंतर मग कोथरूडला करिष्मा जवळ पिझ्झा हट सुरू झाले आणि मग तिथे येणे जाणे.. ऑर्डर करणे सुरू झाले..पण मी ठरले जातीची सुगरण.. पिझ्झा पिझ्झा.. आहे काय त्यात इतकं.. म्हणून घरी पिझ्झा करायचा ठरवलं..(ए... कोण म्हणालं रे माकडीणीच्या हाती कोलीत??).. म्हणून मग बाजारातून पिझ्झा बेस आणले.. त्यावर भाज्या शिजवून, केचप घालून, वरून चीज घालून एका तव्यावर ठेवून भाजलं.. कुकरचा एक डबा त्यावर पालथा घातला..(ओव्हन सारखा फिल देण्यासाठी) आणि मस्त पिझ्झा केला. काय आहे माहिती आहे का.. आमच्या घरी कोणाला एखादा पदार्थ चांगला झाला नाहीये असं म्हणताच येत नाही. त्यामुळे पिझ्झाही एकदम सह्ही वाटला.

यथावकाश आमचे विमान भारतातून अमेरिकेला आले. मग इथे आल्यावर तर काय... काय करू आणि काय नको. स्पॅगेटी करून झाली, वेगवेगळ्या प्रकारे पास्ता करून झाला, व्हेजी पप्फ्फ करून झाले, गार्लिक ब्रेड करून झाला, बेक्ड व्हेजिटेबल्स इन व्हाईट सॉस करून झालं.. पण अजून पिझ्झ्याला हात नव्हता घातला. मैत्रिणींकडून ऐकत होते की, पिझ्झाचं पिठ कसं मळायचं.. काय काय घालायचं. टॉपिंग्ज कोणकोणते घालायचे ,चीज कोणकोणतं वापरायचं... इ. इं. इथे आल्यापासून जेव्हा जेव्हा पिझ्झा खाल्ला तो पिझ्झा हट नाहीतर डॉमिनोज चा. त्यातल्या त्यात झोपडीचाच (पिझ्झा हट) आवडायचा. लेकाला तर फारच आवडायचा.. पिझ्झा ऑर्डर करणार म्हंटलं की स्वारी खुश एकदम. मग त्यावर पायनेपल, ऑलिव्ह्ज.. इ. इ. असे टॉपिंग्ज हवे.. अशा चर्चा त्याच्या सुरू व्हायच्या. चीज पिझ्झा तर त्याचा लाडका.. मग म्हंटलं आता नुसते सल्ले ऐकणं बास मैत्रीणींकडून.. आता आपणच घरी पिझ्झा करायचा. ५-६ संकेतस्थळांवरून पिझ्झाची रेसिपी वाचली. ५-६ संकेतस्थळावर एकच रेसिपि ५-६ वेगवेगळ्या प्रकाराने सांगितली होती.. आता काय करणार?? मग त्या ५-६ वरून मी माझी स्वत:ची अशी एक रेसिपी ठरवली आणि घेतला करायला.

२ कप ऑल परपज फ्लोर म्हणजे मैदा, १ पॅकेट यीस्ट, अर्धाकप कोमट पाण्यात यिस्ट आणि १/२ चमचा साखर घालून ठेउन द्यावे. मग मैद्यात मिठ, तेल आणि हे अर्धाकप पाणी घालावे एकसारखे हलवावे आणि मग लागेल तसे पाणी घालून पिठ पोळीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यावे. ४० मिनिटांनी.. ते फुगलेले असेल. ते पुन्हा हाताने मळून घ्यावे आणि पुन्हा ३० मिनिटे ठेवावे. पुन्हा फुगले की, त्याचा पिझ्झा करावा. तो कसा?? तर... हवा तेवढा गोळा घेऊन, बेकिंग पॅन ला तेलाचा हात लावून, तो गोळा थोडा मैद्यात घोळवून थापावा मग त्यावर मारिनारा सॉस, भाज्या, चीज घालावे आणि ३५० फे. वर १०-१२ मिनिटे बेक करावे. झाला पिझ्झा..

ह्यात तेरेकि... सगळं जमवलं. पिठ मळून ४० मिनिटे ठेवलं.. ते फुगलेलं पाहून आज मै उपर आसमॉं निचे अशी अवस्था झाली. पुन्हा मळलं आणि ३०मिनिटे ठेवलं.. पुन्हा फुगलं. मग काय मी आणखीनच उपर गेले आणि आसमान आणखीनच निचे आलं.. पीठाचा गोळा घेतला मैद्यात घोळवून बेकिंग पॅन वर अगदी निगुतीने थापायला सुरूवात केली. मंडळी, मी भाकरी छान करते बरं का.. म्हणजे तसं लोक्स म्हणतात. तर भाकरीप्रमाणे कडा पातळ आणि मधे जाड असा.. इतका सुबक पिझ्झा थापला मी की काय सांगू. अगदी तोच चंद्रमा नभात.. च्या चालीवर तोच पिझ्झोबा पॅनात.. त्यावर मारिनारा सॉस लावला, भाज्या घातल्या आणि मस्त पैकी चीजही घातलं. आणि दिला ठेऊन गरम ओवन मध्ये. तो फुगायला जसा लागला तसं मला भरून येऊन लागलं.. येस्स! अखेर मी पिझ्झा केलाच.. पण........................ तो असा काही फुगला .. काय सांगू.. अहो बनपावच झाला हो. म्हणजे मी निगुतीने थापलेला पिझ्झा हा कडेने पातळ केल्यामुळे चिज सगळं खाली आलं होतं ओघळून आणि मधे जाड ठेवल्यामुळे पिझ्झा नाही तर तो बनपाव झाला. नवरा म्हणाला.. टॉपिंग्ज म्हणून जर स्मॅश केलेल्या भाज्या आणि त्यावर थोडा पावभाजी मसाला टाकला असता.. तर निदान पाव भाजी म्हणून तरी खाता आला असता हा बनपाव..अस्सा राग आला होता मला.. म्हंटलं असो.. पुढचा गोळा घेतला आणि मग तो मध्ये थोडा कमी जाड ठेवून कडेला जाड थापला.. तो ओव्हन मध्ये अगदि हवा तसा झाला.लेकाला आवडला आणि मी भरून पावले.. त्यातच एकदा तू नळीवर सर्फिंग करता करता संजय टुम्मा दिसला पिझ्झा करताना. आणि त्याने दिलेल्या टिप्स वापरून मग मी पिझ्झा करू लागले.. नंतर केलेला पिझ्झा इतका सुंदर झाला की, प्राजक्ता हट सुरू करावे की काय असे वाटू लागले. ३-४ वेळा केल्यावर मी अगदिच पिझ्झा प्रविण झाले...

मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं..

- प्राजु

5 प्रतिसाद:

Yawning Dog म्हणाले...

माझ्या ताईने असाच एकदा घरी पिझ्झा केला होता, कुणाला विशेष आवडला नाही.
दुसऱ्या दिवशी आईने त्याचे तुकडे करुन फोडणीचा पिझ्झा केला, तो मात्र सगळ्यांनी चवीने खाल्ला :)

sudeepmirza म्हणाले...

छान!

Abhijit Dharmadhikari म्हणाले...

छान झालाय पिझ्झा! :-)

"तू नळी" हा काय प्रकार आहे ते कळेच ना! पंधरा मिनीटांनी प्रकाश पडला! :-)

Maithili म्हणाले...

ekdam sahi aahe pizza puran.

Unknown म्हणाले...

Ur Style of writing is amazing. I was visualizing each moment. Gr8...

Page copy protected against web site content infringement by Copyscape