बुधवार, २१ जानेवारी, २००९

सुवर्णप्रभा..

लाल केशरात रंग खेळते पहाट खास
दिव्य तेज फाकताच जागली दिशांत आस...

तारकांत लोपली निशा उषेस पाठवून
अग्निरंग होत धुंद पूर्व रेखिते नभांस...

सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण
विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास...

वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद
सांडताच पारिजात भूवरी पडेल रास...

थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब
का जपून पाकळीत ठेवलेय मोतियास? ...

सागरात गाज आणि लाट जात उंच उंच
गारवा हवेत आणि वेड लागते मनांस...

पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत
मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास...

दाटले धुक्यात रान, कोवळ्या उन्हांत पान
स्वप्न की प्रभात काल, प्रश्न हाच लोचनास...

- प्राजु

वृत्त : चंचला
मात्रा : गा ल गा ल * ४

1 प्रतिसाद:

sunil म्हणाले...

आपल्या प्रतिभेची सुवर्ण प्रभाच या काव्यांत फाकलेली दिसते. खरच खूप दीवासानी आपणाकडून एवढ्या लखलखत्या तेजाची शब्द्प्रभा वाचावयास मिळाली. पारीजाताची रासच जणू.!पारीजाताचा देठही स्वर्ण रंगी दीसतो. आणी पांढरा रंग पावित्र्य ध्वनित करतो. येथे तर लखलखत्या सोनेरी रंगाची आणी पवित्र ,त्यागाच प्रतीक असलेला पांढरा रंग एखाद्या कलिडोस्कोप मधून पाहात असल्यासारख वाटत. खोटी स्तुती नाही ही. जे वाटल ते लीहील . असो.

Page copy protected against web site content infringement by Copyscape