मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

भाद्र्पदाच्या नभात गुंफण

भाद्र्पदाच्या नभात गुंफण वाऱ्याची अन किरणांची
मेघ म्हणू वा, वीण म्हणावी सरसरणाऱ्या स्वप्नांची
रेंगाळत का राही मिसरा पूर्वेच्या ओठांवरती
धुके विरूनी ओळ सुचवते पाऱ्याच्या थेंबांवरती 
उगवत आहे गर्भामधुनी साद भुईच्या गाण्याची
मेघ म्हणू वा, वीण म्हणावी सरसरणाऱ्या स्वप्नांची
कुठे सावळे कुठे पांढरे कुठे भुरे वा सोनेरी
पखरण होते मनरंगांची मावळतीला विश्वतिरी
थरथर होते पूर्वाईला भिजलेल्या तृण पात्यांची
मेघ म्हणू वा, वीण म्हणावी सरसरणाऱ्या स्वप्नांची
लाज फुलाच्या येते गाली, ओठी काहीसे हलते
श्यामल संध्या शपथ घालते फूल उगाचच गहिवरते
देठ शेंदरी शुभ्र पाकळ्या रांगोळी प्राजक्ताची
मेघ म्हणू वा, वीण म्हणावी सरसरणाऱ्या स्वप्नांची
घ्यावे ओतुन पाणी कोमट केसांवरती स्वप्नाळू
ओलेत्याने माळावा अन पान केवडा लाजाळू
अलगद घालावी बटवेणी अशा नाहल्या केसांची
मेघ म्हणू वा, वीण म्हणावी सरसरणाऱ्या स्वप्नांची
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape