मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

सौख्य म्हणता काय नाही

आणले सारेच आहे, सौख्य म्हणता काय नाही
फक्त तेथे हात फिरवायास त्याची माय नाही
मोजके संवाद आणिक कोरड्या नात्यामधूनी
छानसे बहरून येण्या मी कुणी बोन्साय नाही
साध्य होते सर्वकाही लागणारच कस तुझाही
सोड आरक्षण जरासे 'कष्ट' हा अन्याय नाही
तू नको येऊस मागे संपले सारेच आता
मूक पण नजरेमधूनी बोलला तो काय नाही!!?
तू नको घुसळूस वा विरजण नको घालूस यावर
हा खरा आनंद आहे दूध अथवा साय नाही
नेमकी आहे गजल आयुष्य माझे आणि मीही
कोणताही क्लिष्ट वा अवघड असा अध्याय नाही
पँट आहे चांगली अन् शर्टही आहे बरासा
फक्त जंटलमन दिसाया पास त्याच्या टाय नाही
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape