मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

स्मरणांची गुंफावी वेणी

इकडुन थोडी तिकडुन थोडी स्मरणांची गुंफावी वेणी
एकाएका स्मरणासोबत फेडावी काळाची देणी
एका पेडावरती दिसते सांजवात त्या गाभा-यातिल
शुभंकरोती म्हणताना मी अंगण सुद्धा होते सामिल
दुस-या पेडावरती उठले मायेचे ते ठसे आगळे
भुरकट केसांवरती माझ्या आईचे ते तेल सोहळे
थोडे वरती थोडे खाली मैत्रिण माझी खेळत राही
किती सरळ हे केस तुझे गं म्हणे न त्यांना वळणच काही
बटेत एका फुले माळली त्याने घेउन कह्यात तेव्हा
कधी मोगरा चाफा कुंदा केले गंधित वयास तेव्हा
कितीकदा ते छळती त्याला उगाच नाजुक हळव्या वेळी
कधी चुंबता माने वरती चुंबुन जातो रेशिम जाळी
टोकाशी केसांच्या माझ्या किती लटकती सयी या खुळ्या
माळुन ठेवाव्या वेणीतच स्मरणफुलांच्या गंध कळ्या
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape