मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

युगेयुगे मन माझे

युगेयुगे मन माझे , रिते रितेच राहिले..
युगेयुगे पाठीवर, खुळे नातेच वाहिले
तुला कशाची रे तमा, जनाची ना मनाचीही
माझ्यावर हक्क तुझा, नाही बाकी कुणाचाही
माझ्या तनामनावर, माझ्या येण्याजाण्यावर
माझ्या श्वास ध्यासावर, हक्क तुझा जन्मावर
तुझ्या साद घालण्याला, आले सोडून मी सारे
कधी तळपते ऊन , कधी काळोख पहारे
नाव माझे जगानेही तुझ्या नावाशी जोडले
उदाहरणात कुणी, किती कितीदा गुंफले
जगासाठी त्यागमूर्ती.. कधी नव्हते व्हायचे
तुझ्या माझ्या संसारात मला होते रमायचे
सखी, बहीण, प्रेयसी.. कधी शृंगार संगिनी
झाले नाही प्रिया तुझी कधीच मी अर्धांगिनी
माझ्यासाठी तूच तू रे, जीव देह प्राण श्वास
तुझ्या अवतीभवती चाले यौवनाची रास
असा गेलास तू सख्या, कधी पहिले ना मागे
तुझ्या मागे वेडीपिशी “येईल तो” जगा सांगे
तुला जगाची रे चिंता, तुला जगाचा संसार
म्हणे जगावर तुझे कोटी कोटी उपकार
कधी आले मरणही कधी पेटवली चिता
तुला नव्हतीच कधी माझ्या अस्तित्वाची चिंता
सारे तुला देऊनही तुझ्या पासून वेगळी
कोणी म्हणतात “राधा” कोणी म्हणती मुरळी
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape