मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

सांजेच्या पदरावरती नक्षत्रफुलांची नक्षी

सांजेच्या पदरावरती नक्षत्रफुलांची नक्षी
क्षितिजावर कशिदाकारी, करतात सावळे पक्षी
तो अंतर्मुखसा जोगी, जाताना मिटतो डोळे
सांजेच्या वाटेवरती तो हळदी कुंकू उधळे
पाण्यावर पाउल वाजे वाऱ्याचे भलत्या वेळी
रोमांचित होती लाटा अन थरथरतात लव्हाळी
तो मौन घेउनी जातो पाण्याच्या अंत:करणी
थरथरते पुलकित होते की अबोल होते धरणी?
मी हलके उतरून जाते, पाण्याशी सलगी करण्या
अन काया आतुर होते त्या केशरजळात भिजण्या
अंगाग केशरी होते, अन ओठावर केशर ओळी
पाण्यावर सोडी शेला, मी सैलावत काचोळी
पाठीवर गोऱ्या कोमल अलगदसे फिरते काही
मोरपीस करुनी बोटे तो लिहितो एक रुबाई
डोळ्यात उतरते पाणी वा बिंब कुण्या प्रीतीचे
श्वासात रांगतो दरवळ की भास तुझ्या भेटीचे
कायाही अबोल होते स्पर्शात तुझ्या आतुरल्या
निशिगंधी धुंद कळ्यांनी का खुणा तुझ्या पांघरल्या ?
घे कवेत आता भरुनी हे सोहळे चैतन्याचे
सण मोहाचे, देहाचे ओलेत्या ऐश्वर्याचे !
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape