गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

पहाटेस ओल्या किरणांनी

पहाटेस ओल्या किरणांनी
अंगांगी पाझरते कविता
धसमुसळ्या वा-याच्या सोबत
हासत डोलत झुलते कविता
गवतावरचे मोती ओले
पसा भरूनी घेते आणिक
चाळ बांधुनी पायी नाजुक
ओलेती रुणझुणते कविता
रखरखणा-या लख्ख दुपारी
हिरवाईवर तांबुस केशर
गुलमोहोराचा साज नवा
देहावर पांघरते कविता
देह धुक्याचा सैलावतो नि
अलगद हलका होतो विरतो
जणू सावरीपरी धुक्यातुन
लहरत विहरत फिरते कविता
क्षितिजावरती अंथरताना
सावळ हळवी कातर संध्या
दूर कुठेसा पुरिया ऐकुन
मनोमनी गहिवरते कविता
कधी उशाला घेते तिजला
कधी तिच्या अंकी मी निजते
जोजावत मज असते वेडी
"माझी" मजला म्हणते कविता
पांग कसे मी फेडू कविते
शब्दस्वप्न तू मज दाखवले
नसानसातुन वाहे माझ्या
श्वास श्वास मी जगते कविता
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape