गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

घुमता घुमता तळ्यात अवघ्या उठले तरंग काही

घुमता घुमता तळ्यात अवघ्या उठले तरंग काही
तरंगातुनी चैतन्याची मिळे न कुठली ग्वाही
पिकली पाने सडा घालती पाण्यावर सांडती
व्यथा उरीची थिजून गेली दिशात अवघ्या दाही
विस्कटल्या प्रतिबिंबालाही नसे कुठेही थारा
जरा स्थिरावे तोवर फिरुनी हलवून जातो वारा
काळोखाचा किती दरारा जळात पसरून राही
अनामिकसे भय गोठवतो हिरवा गर्द किनारा
काठावरच्या तरू वरती ना भरते कुठली शाळा
चिवचिवणाऱ्या चोचींमध्ये नाही कसा जिव्हाळा
नसे असोशी उरली आता पानांसोबत त्यांची
जणू पाखरे देऊन गेली कायमचाच उन्हाळा
मूक विराणी गाते कोणी येऊन काठावरती
खोल हालते उरात काही तरंग येती वरती
हरिणी व्याकुळ साद घालते कुणास ठाऊक नाही
तिची आसवे टपटपती अन् तळ्यास येते भरती
अलगद यावा सहस्त्र रश्मी, लंघून क्षितिजाला
कनक शलाका झिरपत जाव्या भेदून पाण्याला
जुने जुनेरे किती कोपरे लख्ख व्हावे आणिक
अवतण द्यावे चैतन्याच्या सुरेल उन्हाला
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape