गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

कुणाचा स्पर्श देहावर असा दिनरात जाणवतो

कुणाचा स्पर्श देहावर असा दिनरात जाणवतो
शहारा रोमरोमावर गुलाबी रंग कालवतो
तुला स्वप्नामध्ये कित्येकदा मी धाडते अवतण
तुझी मग वाट बघण्यातच दिवस रात्रीस मालवतो
तशी मी चांगली आहे तुला ठाऊक नाही का?
क्वचित केव्हातरी माझ्या मनाचा तोल ढासळतो
फुलावे तू फुलावे मी मिठीतूनी फुलावे तन
पहा नुसत्या विचारांनी जणू रोमांच मोहरतो
तुझ्या डोळ्यातुनी तू पेरलेले बीज प्रेमाचे
तुझा गंधाळलेला स्पर्श होता देह पालवतो
सुरू होते जसे हे सत्र वेड्या आठवांचे अन्
मनाला वाटते सुंदर तरी एकांत गहिवरतो
जराशी वादळे येतील भिडता शब्द शब्दाला
बघू सोडून अपुला 'मी' कुणाला कोण सावरतो
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape