गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

निघलास बाप्पा??

निघलास बाप्पा?? 
निघालास पण तुझा चेहरा असा का? 
काही वेगळच घडल्या सारखा!
अरे हसतोस काय? 
तुला दु:ख नाही होत आहे? 
अरे आमची ही शांताबाई वर नाचणारी मुलं बघ..!
तुला पोचवायला जायचं म्हणून कित्ती तयारी करत आहेत..
कित्ती गाणी जमावलीयेत त्यांनी.. बाई वाड्यावर या,
मुंगळाsss म्हणत त्यावर अंगविक्षेप करत
नाचायची केव्हढी तयारी केलीये..!
आणि तू?? काय रे?? यांच्या या मेहनतीचं तुला काहीच नाही?
तू इतका कसा दगडाच्या काळजाचा!
या मुलांना आनंद वाटावा म्हणून तरी किमान
जाताना चेहर्या वर थोडा उदासपणा आण ना!
काय म्हणालास?
शांताबाई, बाई वाड्यावर या, मुंगळा, चिमणी उडाली भुर्र ..
या गाण्यांचा त्रास होतोय?
का बरं? अरे तुझ्या मिरवणूकीत नाचता यावं म्हणून..
कानठाळ्या बसवणार्यार आवाजात ही गाणी वाजत असतात...
आणि हे सगळं कुणासाठी? फक्त तुझ्यासाठी बाप्पा! खरच!
अरे तुला यातली गम्मत कळलीच नाही!
“गणपती बाप्पा..... मोsssssरया!” या घोषणांपेक्षा सुद्धा
वेगळीच गम्मत आहे.. या गाण्यांमध्ये!
आता लोकांना त्रास होतो.. खूप त्रास होतो..
पण गणेश उत्सव म्हणजे हेच असतं ना सगळं!!
नाहीतर गम्मत काय?
काय म्हणालास? डोकं दुखायला लागलं तुझं?
अरे!! तू म्हणजे ना त्या पांढरपेशा लोकांसारखा बोलू नकोस हां!
आता तुझं डोकं आणि तुझे कान मोठे आहेत..
त्याला आम्ही काय करणार?
बाप्पा गप्प बसलेला बघून मला त्याची दया आली!
म्हंटलं , बाप्पा.. अरे अजून तुला पुढे काही तास हे सहन करायचं आहे..
हे अंगविक्षेप.. ही गाणी.. फटाके.. बरच काही! करशील ना?
पण बाप्पा.. जाताना एकदा मागे वळून बघ..
फार काही नाही.. पुन्हा येताना आणखी थोडी जास्ती
बुद्धी घेऊन ये.. ! या नाचणार्याण लोकांसाठी !
या गाण्यांच्या आवाजात तू त्यांना मारत असलेली हाक
त्यांना ऐकू जात नाही, यात त्यांचा काय दोष?
पण मनापासून सांगू बाप्पा.. खरच तू येऊच नकोस !
येऊच नकोस तू.. ! येऊन करशील काय?
एका मखरात दहा दिवस बसून.. समोर चालणारा..
नंगा आणि हिडीस नाच बघवा लागेल..
आम्ही घराची दारं खिडक्या बंद करून घेतो..
तुला तर तोही पर्याय नाही.. !
म्हणूनच.. बाप्पा खरच! येऊच नकोस!
अजिबात फिरकू नकोस इकडे..!
 हे मागणे मान्य करशील ना?
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape