गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

चिखल’ पायवाटा कुणा वाटती

तुझ्या बोलण्याचे किती वेगळाले पहा अर्थ घेतात कोणी कसे
‘चिखल’ पायवाटा कुणा वाटती तर कुणी पाहती पावलांचे ठसे
कसा भार झाडास वाटे फुलांचा नि वा-यासही श्वास जड वाटती
 कळ्यांनी कुणासोबती चालवावे पुढे गंध भरले जुने वारसे ?
तुला शब्द होता दिला ज्या क्षणी मी तुझी सावली होऊनी राहिले
जरी गर्द काळोख होता सभोती तरी ऊन मी आणले छानसे
बिलोरी सयी नाचती खेळती आणि सांडे लवंडे कितीही कुठे!
तरी मन खुळे आठवांचा पसारा नव्याने पुन्हा आवराया बसे
तुला हाक देते, जरा जीवना ये, पुन्हा भेट मजला मनापासुनी
कधी भेट होऊन तू श्वास माझा कधी जाणिवांचेच हो कवडसे
किती लोटला काळ ठाऊक नाही, स्वत:लाच मी भेटले ना अशी
किती लोटला काळ माझ्याकडेही फिरकले कुणी ना तसे फारसे
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape