गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

संध्येचा पदर

लाल केशरी पिवळा .. झाला संध्येचा पदर
त्याला डोंगराचा काठ, आणि क्षितिजाची जर
लाख चांदण्यांचे छोटे, बुट्टे नाजुक रुपेरी
वेलबुट्टी नदीची या, त्यात गुंफली सोनेरी
अस्ताचलाचा ग तिच्या, मळवट भाळावर
चांदव्याचा तनमणी, मिरविते गळ्यावर
अशी शृंगारली सांज, येई क्षितिजाच्या दारी
पायघड्या काजव्यांच्या, घाला विश्वाच्या या तिरी
डोई वरचा पदर , येते सावरत कुणी
तिच्या स्वागतास आणि, दिवा लावीत अंगणी
ओल्या वाटेवर ठसे, सांजेच्या गं पावलांचे
जणू गोंदण नाजूक, भिजलेल्या आठवांचे
झरे हळवासा गंध, सांजकुपीतून मंद
दान प्राजक्ताचे जणू, झुले अंगणाचा स्पंद
अशी सोवळी सुंदर, संध्या पाझरे मनात
डोळे मिटूनिया हात नकळत जुळतात.
.
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape