गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

दु:खाची बघ झाली बदली वाटत आहे

दु:खाची बघ झाली बदली वाटत आहे
आयुष्याशी थोडी सलगी वाटत आहे
गाली टिचकी मारत म्हणतो हास जराशी
राखावी त्याचीही मर्जी वाटत आहे
किती घालते साद तरी ना उघडी डोळे
विठू रंगला टाळ मृदंगी वाटत आहे
नको करू तू मिठी, चुंबने भलत्या गोष्टी
लाज उगाचच येइल नयनी वाटत आहे
जशी असोशी अंधाराशी झाली मााझी
गंधाळुन फुलण्याची उर्मी वाटत आहे
चार तुझ्या प्रेमाच्या शिंतोड्यांनी मेघा
फुलली सजली-धजली धरणी वाटत आहे
आवरताना उष्ण उसासे भल्या पहाटे
काया झाली जणू सुरंगी वाटत आहे
खुळ्या पावसाला जर घेशिल कवेत 'प्राजू'
झिंगत राहिल असाच गगनी वाटत आहे
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape