गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

कसा माझा मला पडला विसर..कळले मला

कसा माझा मला पडला विसर..कळले मला
तुझ्यासाठीच जगले आजवर...कळले मला
किती मी साठवीले..तू, तुझे हे आणि ते
जशी लिहिली तुझ्यावरती बखर..कळले मला
जशी झाली सुरू स्वप्नातली वर्दळ तुझी
तशी निजलेच ना मी रात्रभर.. कळले मला
तुला नाकारणेही जीवना नाही जमत
तुझा सांभाळही आहे जहर.. कळले मला
‘तरुन जाईन मी’ आशा मला ना वाटते
किनारा राहिलाहे दूरवर.. कळले मला
पहा झिडकारते आहे सुखाला आजही
पुन्हा आली मनाला ही लहर .. कळले मला
नव्याने येत आहे वेदना माझ्याकडे
व्यथेलाही नवा येइल बहर.. कळले मला
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape