गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

स्थित्यंतरे ..

खुळ्या सांजवेळा खुळा तोच गहिवर 
कुणी रोज त्याला कसे सावरे ??
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. 
मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..

उन्हासोबतीने असे चालते की 
जणू सावलीशी न नाते जुळे
झुगारून देई जुन्या रीतभाती 

मिठी मारते वादळाला खुळे
फिरे धुंद
, संदिग्ध पण सोवळेसे, 
थव्यातून फिरती जशी पाखरे
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. 

मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..

दिवे लागणीची जशी वेळ येते 
दिसे अंगणी सांजवातीपरी
जणू होत स्मरणे विरागी स्वरांनी 

फिरे अंतराळी जशी सावरी
तमा ना कुणाची कशाची मनाला
, 
जसे मन म्हणे ते तसे वावरे
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. 

मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..

निळ्या सावळ्याशा दिगंतावरी ते 
नवा खेळ खेळे दिशांसोबती
कधी पूर्व तर अन् कधी पश्चिमेला 

मिती शोधते आपुल्या भोवती
कधी एकटे तर कधी संगतीने 

गवसती कशी त्यास गत्यंतरे  ??
कधी मुक्त उन्मुक्त गंभीर केव्हा.. 

मनाची किती हाय! स्थित्यंतरे ..   
-प्राजू







Page copy protected against web site content infringement by Copyscape