शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

माहेर गं

माझ्या येण्याने गं .. खुलते फुलते
मला झुलवते.. माहेर गं
दारी वाट बघे.. माझी वेडी आई
जन्माची पुण्याई, तिची कूस!
बाबाच्या मनाची, घालमेल दिसे ,
मनाला गं पिसे .. त्याच्या लागे
लाडाची गं लेक.. पाहुणीच झाली..
चार दिस आली.. झुरवाया
अंगण विचारी, ख्याली नि खुशाली ..
म्हणे आता आली, माझी सखी
नाचर्या पायाने , धावे किती मन ..
साठवावे क्षण , हृदयात
मन कालवड .. मायेच्या पंखात ,
शंख शिंपल्यात मोती जणू
भरुनिया घ्यावा , माहेराचा गंध, ..
एक एक स्पंद मोहरावा
माहेराचे वेड, कुणाला कळावे..
पाऊल पडावे.. अंतराळी
निघता निघेना, जडावले पाय..
काजळाची साय.. पापण्यात
लावूनिया भाळी, माहेरची माती..
पाळू जनरीती .. दुनियेची
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape