शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

घडले कितीहि काही

घडले कितीहि काही तरिही अलिप्त आहे
माझेच मन कशाने इतके विरक्त आहे
देशात राहुनी जो देशाविरूद्ध बोले
त्यालाच आज म्हणती..तो देशभक्त आहे
दु:खास चावूनी खा चघळायला व्यथा घे
भागव भुकेस यावर.. इतकेच स्वस्त आहे
तू धाड पावसाला देवा अता भुईवर
मी धाडली जिवाची माझ्याच पोस्त आहे
नाही कुठेच जागा बिनघोर झोपण्याला
सरणावरीच कळले ही शेज मस्त आहे
बिनधास्त ओघळावे गंधाळल्या फुलाने
इतके कुठे कुणाचे अंगण प्रशस्त आहे
अधिकार निर्णयाचा नाही तुला अजूनी
गर्भावरी सुधा गं त्यांचीच गस्त आहे
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape