शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

तुझी बाधीत मी होते

जवळ असतोस तू तेव्हा पहा गंधीत मी होते
नवी असल्याप्रमाणे अन मला माहीत मी होते
तुझे असणे तुझे दिसणे , मला व्यापूनीया उरणे
नुरे माझे असे काही, तुझी बाधीत मी होते
तरारूनी उठे रोमांच माझ्या अंगणी ओल्या
तुझा प्राजक्त झरताना फुले झेलीत मी होते
तुझ्यासाठी जगाशी भांडणे हे नित्य झालेले
तुझ्यासाठी तुझ्याशी भांडता भयभीत मी होते
कधी जमिनीवरूनी पाय ना सुटले तुझे म्हणती
तयांना ठाव नाही की, तुझ्या मातीत मी होते
तुझ्या बोटातली जादू जशा झंकारती तारा
सतारीच्या परी हा देह अन् संगीत मी होते
फुले तू तोडली रंगीत, मनमोही , नि सुंदर... पण
तुला कळलेच ना मातीतल्या बकुळीत मी होते
- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape