शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

रान करपलं झाली लाही

रान करपलं झाली लाही जमीनिवरती भेगा
किती कोरड्या लिहिल्या सटवाईने भाळी रेघा
आग म्हणू की म्हणू फुफाटा मातीला मी काळ्या
धाड टाकती आयुष्यावर दुष्काळाच्या टोळ्या
पिके उभ्याने जळून गेली संसाराची दैना
चा-याविण तळमळतो राघू निपचिप पडली मैना
पाण्यासाठी पाय चिमुकले तुडवित रानोमाळी
ढग एखादा जरा दिसावा खुल्या निळ्या आभाळी
करपुन गेले रखरखत्या मातीवर हिरवे गाणे
तरी पेरले बघ बाळांच्या ओठीचे मी दाणे
ढगा तुला ना लाज जराही कुठे फेडशिल पापे
"धाव पावसा सत्वर आता” धारणी आर्त विलापे
प्राण ठेव तू माझे तारण नकोस भलवू नुसता
डोळा येइल पाणी पण ते येइल हसता हसता
धरणीला तू ये भेटाया घालत मी साकडे
तुझ्या स्वागता झडतिल बघ तू सनई अन चौघडे ... सनई अन चौघडे !
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape