कदंब
सळसळणारी हिरवळ देही, विस्तिर्णाचे पान
समांतराचा ध्यास उराशी, सममितीचे भान
समांतराचा ध्यास उराशी, सममितीचे भान
हिरवट, पिवळे, तांबुस लोलक, नाजुक इवली फुले
वा-यावरती सरसरणारे, गंधविभोरी झुले
वा-यावरती सरसरणारे, गंधविभोरी झुले
हिरवाईवर तांबुस हळदी, केसर भरले तुरे
चेंडूवरती कशिदाकारी, रुणझुणती गोपुरे
चेंडूवरती कशिदाकारी, रुणझुणती गोपुरे
कृष्णसखा की म्हणू कदंब, रूप तुझे भरजरी
पानोपानी जणू वाजते , कान्हाची बासरी
पानोपानी जणू वाजते , कान्हाची बासरी
अवतीभवती पिंगा घालत भ्रमरांची लीला
मोह वाटुनी सोडुन येई आम्रतरू कोकिळा
मोह वाटुनी सोडुन येई आम्रतरू कोकिळा
रुंद-अरुंदशा हिरवाईची दाट तुझी सावली
शांत असा विश्रांत जिवाला, स्मरते मज माऊली
शांत असा विश्रांत जिवाला, स्मरते मज माऊली
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा