सांज कलताना
सांज कलताना मनावर सावली का दाट झाली
वाटते मज पैलतीराहून कोणी साद घाली
वाटते मज पैलतीराहून कोणी साद घाली
पेरले होतेस तू जे बेगडी होते बियाणे
अन म्हणे माझी जमीनच वांझ नि नापिक निघाली
अन म्हणे माझी जमीनच वांझ नि नापिक निघाली
"जाउदे गेलेत त्यांना मी तुझ्या राहीन सोबत "
थोपटूनी पाठ मजला वेदना माझी म्हणाली
थोपटूनी पाठ मजला वेदना माझी म्हणाली
राहुदे उघड्यावरी अन बोचुदे मुर्दाड वारा
तू मना ओढू नको त्या फाटलेल्या सभ्य शाली
तू मना ओढू नको त्या फाटलेल्या सभ्य शाली
वार तू केलेस कोसळत्या सरींच्या सारखे अन
सावराया वेळ नव्हता, बघ कशी त्रेधा उडाली
सावराया वेळ नव्हता, बघ कशी त्रेधा उडाली
रूप शेवंती परी अन गंध होता मोग-याचा
राहिली ना ओढ गालावर तशी चढली न लाली
राहिली ना ओढ गालावर तशी चढली न लाली
तापलेली कोरडी रखरख भुईची पाहुनीया
घाबरूनी एक वेडी सावली काळोख ल्याली
घाबरूनी एक वेडी सावली काळोख ल्याली
लेखणीने जोर धरला अन मनाला लख्ख केले
वाटते आहे पुन्हा की, वेदना गर्भार झाली
वाटते आहे पुन्हा की, वेदना गर्भार झाली
सोंगट्या आहेत स्वप्ने आणि पट ह्या वास्तवाचा
फेकुनी फासे व्यथेचे नशिब खेळे क्रूर चाली
फेकुनी फासे व्यथेचे नशिब खेळे क्रूर चाली
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा