शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

आकाशाचा तुकडा भेदून

आकाशाचा तुकडा भेदून रेषा झरती झरझर खाली
आनंदाच्या चैतन्याच्या वहात ओल्या निळ्या पखाली
आडव्या तिडव्या रेघामधुनी धुरकटले जांभुळसे डोंगर
सचैल पानांमधुनी दाटे वा-याचा धसमुसळा वावर
मन ओलेते तन ओलेते ओल्या सावळ सायंकाळी
खुल्या दिशांचे खुले हाकारे झिरपत जाती रानोमाळी
आभाळाच्या चिंब अंगणी फिस्कटल्या रंगांची पखरण
अस्ताचे या बिंब सावळे धुक्याधुक्याचे झुलते तोरण
शिडकाव्याने भिजली माती मृदगंधाचा उत्सव होई
शीळ घालुनी गंध पालखी मिरविती हे वा-याचे भोई
मिठीत घ्यावा ऋतू गर्दसा प्राण प्राण हा पाऊस व्हावा
धुक्यातून उतरावा अलगद , हिरवाईतच विरून जावा
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape