मी थोडी हळवीशी होते
मी थोडी
हळवीशी होते, सळसळणारी नदीशी होते
माझ्या वळणा-घाटामधुनी, वाट नवी हिरवीशी होते
अस्मानीची मीच निळाई, वेलीवर
लखलखती जाई
ऋतूराजाची चाहूल येता, मोहरणारी मी आमराई
मी देवाच्या दारी तोरण, रंग भारला सचैल श्रावण
उदयाची मी रंगसंगती अन अस्ताचे मी गहिरेपण
मीच धुक्याचा रेशीम शेला, गिरिशिखरांवर पांघरलेला
मी पानातून ढळता मोती , बकुळफुलांचा धुंद तजेला
मी पुनवेची रात निराळी, गूढ नि गहिरी आवस काळी
मी विरणारी संध्याछाया, पहाट मंगल नवी नव्हाळी
मी मातीचे व्याकूळ आर्जव, काळ्या मेघा मधले मी दव
खळखळणार्या नदी किनारी, मंदिरातला मी घंटारव
मी भणभणता उनाड वारा, इवल्या
चोचीमधला चारा
आनंदाने थरथरणारा , मी
फुललेला मोर पिसारा
किती किती ही रुपे मनाची, उसंत नाही जरा क्षणाची
कधी अचानक होते मोठे, कधी आठवण
बालपणाची ..
................कधी आठवण बालपणाची..!
- -- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा