झाड माझे
आज गुलमोहोर झाले रापलेले झाड माझे
मिरवते अंगावरी बघ ग्रिष्म- शेले झाड
माझे
जिद्द जगण्याची अशी आली कुठूनी ना कळे
मज
पालवी होऊन फुटले जाळलेले झाड माझे
पूर्ण करण्याला अपेक्षा आणि कर्तव्ये
हजारो
आजही खंबीर आहे वाकलेले झाड माझे
चार शिंतोडे उडू द्या, तरतरी येतेच त्याला
आणि डोलू लागते मग वाळलेले झाड माझे
ऊन वादळ, पावसाळा, पानगळ सोसूनही बघ
भासते मज नेहमी आनंद ठेले झाड माझे
अंगणीची ना तुळस ना वृक्ष डेरेदार
पिंपळ
गंध प्राजक्तापरी ओथंबलेले झाड माझे
घाव त्याने घातला माझ्या मुळाशी त्याच
वेळी
मोडुनी उध्वस्त झाले आणि मेले झाड
माझे
-प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा