शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

उठून पंगत जाते

किती त-हेने म्हटले 'नाही' तरिही गुंतत जाते
तुझ्या सयींच्या सवे घराला वाळूत बांधत जाते
नकोस देऊ नवीनवीशी सुखे मला तू देवा
सहज सुलभ जे मिळते त्याची उतरत किंमत जाते
मनापासूनी बंड करावे कितीकितीदा वाटे
पेटुन सुद्धा उठते, ऐत्यावेळी हिंमत जाते
कळ्या उमलती दरवळ होतो जगास कळते सारे
तरी कोकिळा 'वसंत आला' उगाच सांगत जाते
हात जोडते वाहुन नारळ दुर्वा फुले नि पेढे
इच्छा सांगुन मनात त्याचा हिशोब मांडत जाते
माझ्या एकांताला कसला शाप कुणाचा आहे
स्वप्नांना या वाढू म्हणता उठून पंगत जाते
मनातल्या या रस्त्यांवरचे दिवे मालवा कोणी
म्हणे निसर्गामधली उर्जा अशीच संपत जाते
- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape