शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

काळोख गर्द झाला

पंखात रात्र अपुल्या जोजावते उन्हाला
म्हणतात लोक वेडे काळोख गर्द झाला
कर्तव्य पार पाडत येतात मंद झुळुकी 
छेडून आर्त पुरीया चिरतात काळजाला
आता कुठे जराशी मिळते उसंत आहे
उकलू नकोस जखमा.. सांगा कुणी मनाला
हलवून रोज भाता यांत्रीक श्वास माझे
‘आहेत प्राण बाकी!’ समजावती जिवाला
शपथा नि जीर्ण वचने, चिंध्याच शेवटी त्या
गोळा करून घेते रात्रीस मी उशाला
रात्रीवरी कुणाचे नि:श्वास हे उमटले
पाण्यास ना भुईला .. ना ज्ञात अंबराला
झोपावयास आता तू काढ वेळ ‘प्राजू’
दडपून आठवांना अंगाइ गा स्वत:ला
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape