बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

जेथे न रम्य वाटे

जेथे न रम्य वाटे ,रमण्यात अर्थ नाही
जाळुन उगी जिवाला, जगण्यात अर्थ नाही
खोटीच माणसे अन् खोटीच सर्व नाती
सत्यास सिद्ध येथे करण्यात अर्थ नाही
नशिबात फक्त सुकणे, किंवा जळून जाणे
अंकूर होऊनिया फुटण्यात अर्थ नाही
संस्कार शिक्षणाने घडलो घड्यापरी पण
घडल्यावरीच कळले घडण्यात अर्थ नाही
सुकली कुठे पिके अन् कोठे कुजून गोली
पाऊस मित्र त्यांचा म्हणण्यात अर्थ नाही
आनंद चेहर्यावर घेऊन हासताना
हसतेस तू जशी, त्या हसण्यात अर्थ नाही
खुडतील अंतरी वा डसतिल वयात येता
मुलगी म्हणून उदरी रुजण्यात अर्थ नाही
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape