बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

दूर दूर त्या क्षितिजापाशी

दूर दूर त्या क्षितिजापाशी संथ लयींचे
दिसती तांडे निळे सावळे मेघ सरींचे
अलगद हलके वार्याऊसोबत नवेनवेसे
पसरून गेले थेंबांचे या किती कवडसे
नाचू लागे पाण्याचे मग ओले पाऊल
छपरावरती सरीसरींची सचैल चाहूल
मधेच हळदी कधी रुपेरी अंग उन्हाचे
मोत्यांची मग पानांवरती वरात नाचे
निळे जांभळे लाल केशरी झुकले सारे
ऐलतीरातून पैलतीराशी रंग पसारे
लवलवणारा शुभ्र पिसारा झुलवत झुलवत
कडे कपार्याा नटती सजती खुळावल्यागत
तिन्ही सांजेला ऐकत रात्रीची अंगाई
जणू चांदण्या निजती ओढून मेघ रजाई
आणि पहाटे पाऊल माझे अलगद भिजते
गवतावरचे मोती माळून बस! लखलखते
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape