लिहायला मज सध्या काही सुचतच नाही
लिहायला मज सध्या काही सुचतच नाही,
तरी पहा मन माझे बिल्कुल खचतच नाही..
काय लिहावे, किती लिहावे आणि कुणावर
नकोच वाटे भार कशाचा आज मनावर
लिहिले प्रेम, माया ममता आणि विरह
लिहिली मैत्री आणि मैत्रीमधला कलह
लिहिली फुले, पाने,
पक्षी आणि सागर
मधुमास आणिक चांदणरात्रीचाही जागर
लिहिल्या रात्री, तिन्ही सांजा
आणि रम्य सकाळी
सुख दु:खाच्या परिभाषांची लिपि निराळी
लिहिले वादळ, झिम्मा काठाशी लाटांचा
लिहिला चकवा रानमधल्या गुढ वाटांचा
लिहिला मनातल्या प्रश्नाचा खेळ विचित्र
लिहिले मौसम, कडे कपारी झरे सचित्र
समाज लिहिला, लिहिल्या स्त्रीया लिहिली आई
लिहिली तान्हुल्या साठी इवली अंगाई
व्यथा कथा अन दु:ख वेदना लिहिली स्मरणे
लिहिले त्याच्या मिठीत माझे मुक्त वितळणे
लिहू अताशा समजत नाही काय नव्याने
थोडे थांबून लिहिणे होईल का माझ्याने ?
-प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा