बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

पाहते अस्तास त्याला रोज जाताना

पाहते अस्तास त्याला रोज जाताना
आठवांच्या शेंदरी रंगात भिजताना

कोणतेसे दु:ख सोबत रोज तो नेतो
आसवांनी डोह हा खारावला जातो
आणि भरते येत जाते मूक लाटांना
आठवांच्या ..

कोणती अज्ञात आहे ओढ ना ठावे
सांज पसरुन पंख काळोखात झेपावे
लांबणार्‍या सावल्या हलकेच विरताना
आठवांच्या ..

रोज येथे मी मनाला घेउनी येते
रोज स्मरणांचे असे मोहोळही उठते
अन धुके डोळ्यात उरते रात्र भिडताना
आठवांच्या ..

-प्राजू 

Page copy protected against web site content infringement by Copyscape