मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

काठ....!

तू लहरत विहरत असता 
बिलगून तुला मी असतो
तुझ्या मोहक वळणामधुनी
मी तुझाच होऊन वसतो..
तू उन्मादे उधळत असता
मी तुझ्यात हरवून जातो
ना खुणाच उरती माझ्या
मी अस्तित्व गमावून बसतो
येतात नवीन नव्हाळे
मौसम अन त्यांचे सोहळे
मी भुलतो अन गुणगुणतो
स्वप्नांकूर हिरवे कोवळे
कित्येक तहानले येती
सांगून नवीनच नाती
मी त्यांना आपुले म्हणतो
होऊन तुझा सांगाती
तू नदी अनोखी, निर्मळ
मजभवती तुझाच दरवळ
म्हणतात कुणी मज काठ
पांघरला ओली हिरवळ
-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape